Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवरील ड्रग्ज पार्टी एनसीबीनं (NCB) उधळून लावली होती. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan arrested) याच्यासह एकूण १६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर वेगळच वळण मिळालं आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्यावर आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत ते पंच असल्याचा खुलासा केला आहे.
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकूण १० पंच आहेत. प्रभाकर साईल, किरण गोसावी, मनीष भानुशाली, ऑब्रे गोमेज, आदिल उस्मानी, व्ही. वायंगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैझ, मुजम्मिल इम्ब्राहीम अशी या १० पंचांची नावे आहेत.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात गेल्या चार दिवसांत एनसीबीनं केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. मुंबईतील जोगेश्वरी भागात आज एनसीबीनं छापा टाकला. यात १५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून अब्दुल शेख नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या अटकेत असलेल्या मोहक जयस्वालनं दिलेल्या माहितीच्या आधारे आज हा छापा टाकण्यात आला होता. तसेच नवाब मलिकांनी केलेले आरोप निराधार असल्याचे एनसीबीने म्हटलं आहे.