लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना केलेली अटक कायदेशीर असल्याने त्यांनी दाखल केलेली ‘हॅबिअस कॉर्पस’ याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही, असे म्हणत ईडीने नवाब मलिक यांच्या याचिकेला विरोध केला. ईडीने जबरदस्तीने त्यांच्या कार्यालयात नेले आणि तिथेच समन्स बजावले, असा दावा मलिकांनी याचिकेत केला आहे. त्यांच्या या याचिकेवर ईडीने प्रतिज्ञापत्र दाखल करत मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले.
ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजता अटक करण्यात आली. ते मुलासह ईडी कार्यालयात स्वत:हून आले. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आणि मग अटक केली. मलिक यांच्या कार्यालयाद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये मलिक यांना जबरदस्तीने ईडी कार्यालयात नेल्याचे म्हटले आहे. मलिकांनी आरोप केल्याप्रमाणे ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित नाही. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मलिक यांनी हॅबिअस कॉर्पसमध्येच ईसीआयआर (ईडीने नोंदविलेला गुन्हा) रद्द करण्याची व जामिनावर सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही. तसेच मलिक यांना करण्यात आलेली अटक कायदेशीर आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम १९अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आणि विशेष न्यायालयाने त्यांना आधी ईडी कोठडीही सुनावली.
सन १९९५ ते २००५ दरम्यान घडलेल्या व्यवहाराप्रकरणी पीएमएलए पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला. त्यामुळे माझ्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, असे मलिक यांनी याचिकेत म्हटले आहे. मात्र, ईडीने हा आरोपही फेटाळला. आर्थिक गैरव्यवहार हा सातत्याने होणारा गुन्हा आहे. त्यामुळे कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होण्याचा प्रश्न येत नाही. मलिक यांनी कायद्यातील तरतुदींच्या वैधतेला आव्हान दिलेले नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने मलिक यांच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.
नवाब मलिकांना न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने सोमवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मलिक गेले १२ दिवस ईडी कोठडीत होते. मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. त्यापूर्वी ईडीने मलिक यांची आठ तास कसून चौकशी केली होती. सोमवारी मलिक यांना विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांच्यापुढे हजर करण्यात आले. ईडीने कोठडी न मागितल्याने न्यायालयाने मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. काही दिवसांपूर्वी एनआयएने दाऊद इब्राहिम व अन्य काही जणांविरोधात गुन्हा नोंदविल्यावर ईडीनेही कारवाई केली. एनआयएने या सर्वांवर युएपीएअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.