लोकमत न्यूज नेटवर्कचिखली/बुलडाणा : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात रान उठवणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक कोण आहेत? त्यांचा जावई कोण आहे? त्यांचे बॅकग्राऊंड काय आहे? नवाब मलिकांनी आधी आपले बॅकग्राऊंड बघावे, असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिखली येथे रविवारी केले.
चिखली येथे उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात समीर वानखेडे यांच्या ‘प्रायव्हेट आर्मी’संदर्भात मोठा खुलासा करण्याबाबत मलिक यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राणे यांना विचारणा केली असता ‘आमचेही तेथे १०५ जण आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेथे आहेत’, असे सांगत भाजप वानखेडे यांच्या पाठीशी उभी राहण्याचे संकेत राणे यांनी दिले. केंद्र सरकार वानखेडे यांच्या पाठीशी आहे का? असा थेट प्रश्न विचारला असता याबाबत पंतप्रधान मोदींशी बोलून सांगतो, असे उपरोधिक उत्तर त्यांनी दिले.
चेंबूरची ‘ती’ व्यक्ती आमचा कार्यकर्ताचेंबूर येथील एका व्यक्तीचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत, तसे माझेही आहेत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. सोबतच तो व्यक्ती काय आतंकवादी आहे का? तो आमचा मित्र नाही तर कार्यकर्ता आहे, असेही राणे यांनी मलिक यांच्या यासंदर्भातील वक्तव्याबाबत छेडले असता सांगितले. दरम्यान, आगामी दोन वर्षात शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील. त्यांना तपासून आम्ही भाजपमध्ये प्रवेश देऊ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठीची गुणवत्ता त्यांच्यात नाही, असे राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता म्हटले.
किरण गोसावीवर पुण्यात तीन गुन्हे दाखलपुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेल्या किरण गोसावी याने नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याबरोबर पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचेही उघडकीस आले आहे. वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रकाश माणिकराव वाघमारे (४८, रा. महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण प्रकाश गोसावी (रा. सानपाडा), त्याचा सहकारी आणि कुसूम गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गोसावी याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.