मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात येत आहे. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवाब मलिकांवरील कारवाई हे केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापराचं उदाहरण असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, याबाबत काय बोलायचं? यात काही नवीन नाही. सध्या ज्या प्रकारे यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कधीतरी घडेल. नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.
मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले होते. मात्र, आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू होती.