कॉर्टेलिया क्रूजवर झालेली ड्रग्ज पार्टीमधून एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आधी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर अटक केली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला असून या पार्टीचे आयोजक काशिफ खान समीर वानखेडेंचे मित्र असल्यामुळेच त्यांना अटक केली नसल्याचा दावा मालिकांनी केला आहे. मात्र, हे आरोप बिनबुडाचे असून मी कोणतीही पार्टी आयोजित केली नव्हती अशी माहिती काशिफ खान यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती आहे. मला वाटतं की, त्यांच्याकडे सर्व चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी साधी सिगारेटही ओढत नसल्याचं लोकांना माहिती आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत, साफ चुकीचे आहेत. मी त्यांना ओळखत नाही, मी कधीही त्यांना भेटलेलो नाही. मला माहिती नाही ते मला या प्रकरणात का ओढत आहेत. त्यांना ज्यांनी कुणी चुकीची माहिती दिली आहे, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला आहे, असा खुलासा काशिफ खान यांनी केला आहे.
क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात मंत्री नवाब मलिकांनीसमीर वानखेडे यांच्यावर आरोप करत या प्रकरणात काशिफ खानला का सोडण्यात आलं? असा सवाल केला आहे. काशिफ हा समीर वानखेडेंचा मित्र असल्याने NCB अधिकाऱ्यांना कारवाईपासून रोखलं गेले असा आरोप मंत्री मलिकांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. नवाब मलिकांनी(Nawab Malik) वानखेडेंच्या बाजूने बोलणाऱ्या भाजपा नेत्यांना आता तोंड दाखवायलाही जागा उरली नाही अशा शब्दात टीकास्त्र सोडलं आहे.