मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आहेत. गोवावाला कम्पाउंड खरेदी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. कुर्ला येथील गोवावाला कम्पाउंडची जागा बळकविण्यासाठी ‘डी गँग’ सदस्यांसोबत आर्थिक गैरव्यवहार व गुन्हेगारी कट रचण्यात मंत्री नवाब मलिक यांचा थेट व जाणूनबुजून सहभाग होता, हे दर्शविणारे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे ईडीने मलिक यांच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल घेताना विशेष पीएमएलए न्यायालयाने सांगितले. गेल्या महिन्यात ईडीने मलिक यांच्यावर पाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्याचे वाचन केल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी म्हटले की, तक्रारीमध्ये आरोपीवर करण्यात आलेले आरोप आणि रेकॉर्डवर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता या प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यास पुरेशी कारणे आहेत.
तसेच ईडीच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांनी एक एक खळबळजनक माहिती त्यांनी दिलेल्या जबाबातून उघड झाली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता, असा जबाब मलिक यांनी ईडीला दिल्याची माहिती समोर आली आहे. २००२ सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता, अशी नवाब मलिक यांनी ईडीला दिलेल्या जबाबात नमूद असल्याची माहिती टीव्ही 9 ने दिली आहे. फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नवनवीन आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दाऊद आपला भाऊ इक्बाल कासकरसह त्याच्या भावंडांना आणि नातेवाइकांना दर महिन्याला १० लाख रुपये पाठवत असल्याची माहिती ईडीला समजली आहे. इक्बाल कासकरलाही ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
इक्बाल कासकरच्या बालपणीच्या मित्राचा धाकटा भाऊ खालिद उस्मान शेख याने ही माहिती दिली आहे. ईडीला दिलेल्या जबाबात खालिद उस्मान म्हणाला की, माझा भाऊ अब्दुल समद आणि इक्बाल कासकर हे बालपणीचे मित्र होते आणि त्यांनी बराच काळ एकत्र घालवला आहे. अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम टोळी यांच्यात झालेल्या टोळीयुद्धात ७ डिसेंबर १९९० रोजी माझा भाऊ मारला गेला, असे खालिद म्हणाला. जेव्हा माझा मोठा भाऊ मारला गेला तेव्हा इक्बाल दुबईत होता आणि तो भारतात परतला तेव्हा तो माझ्या आईला भेटायला आला होता.
सलीम अहमद सय्यद उर्फ सलीम पटेल हा त्याला त्याच्या नावाने ओळखत असल्याचा खुलासाही खालिद उस्मानने केला आहे. तो म्हणाला की, पटेल त्याच शेजारी राहत होता आणि मृत सलीम पटेल आणि खालिद दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरची बहीण हसीना पारकर जिचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यासाठी सलीम ड्रायव्हर म्हणून काम करत असे.
सलीम पटेल हा हसिना पारकर हिच्यासाठी जमीन हडप करून मालमत्तेचे वाद मिटवत असे. हसीना पारकरने दाऊद इब्राहिमच्या नावाचा भरपूर वापर करून पैसे कमवले. खालिदने पुढे सांगितले की, मुंबईतील वांद्रे येथील असाच एक फ्लॅट सलीम पटेल आणि हसिना पारकर यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतला होता.