मुंबई - गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने आज मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एनसीबीने आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली आहे. एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे.
ड्रग्स रॅकेट प्रकरणीएनसीबीने आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीकडून समीर खान यांची सुमारे दहा तासांपासून चौकशी सुरू होती. दरम्यान, सुमारे दहा तास चाललेल्या चौकशीनंतर समीर खान यांना अटक करण्यात आली, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली.
ड्रग्स पेडलर करण सजनानी याच्या चौकशीमधून समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास समीर खान हे एनसीबीच्या कार्यालयात जाताना दिसले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्स प्रकरणातील एक आरोपी आणि समीर खान यांच्यात ऑनलाइन ट्रान्झॅक्शन झाल्याचे दिसून आल्यानंतर एनसीबीने त्यांच्या दिशेने मोर्चा वळवला होता. दरम्यान, या प्रकरणात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि अन्य दोघांना गेल्या आठवड्यात २०० किलो ड्र्ग्ससह अटक करण्यात आली होती.