रायपूर – छत्तीसगडमध्ये अलीकडेच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे २२ जवान शहीद झाले आहेत. (Sukma Naxal Attack) देशातील प्रत्येक नागरिक या घटनेचा निषेध करून नक्षलींविरोधात सरकारने कडक कारवाई करण्याची मागणी करत आहे. यातच आसाममधील एका ४८ वर्षीय लेखिकेने जवानांच्या बलिदानावर फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली. त्यानंतर मंगळवारी या लेखिकेला देशद्रोहासह अन्य आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
गुवाहाटी पोलीस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता म्हणाले की, लेखिका शिखा सरमा यांच्यावर विविध कलमं ज्यात IPC १२४ अ(देशद्रोह) याचाही समावेश आहे. या लेखिकेला अटक करण्यात आली आहे. शिखा सरमा या लेखिकेने फेसबुकवर लिहिलं होतं की, पगार घेणारे कामगार जर ड्यूटीवेळी मरत असतील तर त्यांना शहीद कसं बोलू शकतो. याच लॉजिकनुसार जर वीज विभागातील कर्मचारी जो करंट लागून मृत्युमुखी पडतो त्यालाही शहीद म्हटलं पाहिजे. मीडियाच्या लोकांनी भावूक बनू नये असं या लेखिकेने म्हटलं आहे.
शिखा सरमाची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियात चर्चेचा केंद्रबिंद बनली आहे. मोठ्या संख्येने लोकं याचा विरोध करत आहे. सोमवारी गुवाहाटी हायकोर्टाचे वकील उमी डेका बरुआ आणि कंगकना गोस्वामी यांनी दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात FIR नोंदवली आहे. तक्रारकर्त्यांनी शिखाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिखाचे विधान हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे. ही पोस्ट राष्ट्र भावनेतून सेवा करणाऱ्यांवर हल्ला आहे. दिसपूर पोलीस स्टेशनने याबाबत तक्रार नोंदवून घेत शिखा सरमाला अटक केली आहे.
काय घटना घडली?
शनिवारी ३ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये २२ जवानांचा मृत्यू झाला होता. पैकी २१ जवानांचे मृतदेह हे रविवारी सापडले होते. बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला करून केलेल्या जीवितहानीकडे सुरक्षा दले आणि गृहमंत्रालय नामुष्की म्हणून पाहत असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठे अभियान चालवण्याच्या मोहिमेची तयारी झाली आहे. या मोहिमेमध्ये नक्षलवाद्यांच्या काही टॉप कमांडरही सुरक्षा दलांच्या रडारवर असतील. त्यामध्ये बिजापूर नक्षली हल्ल्यामधील एक मास्टरमाईंड असलेला हिडमा याचाही समावेश असेल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील अभियानाला गती देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तसेच त्यासाठी ह्युमन इंटेलिजेन्स आणि टेक्निकल इंटेलिजेन्सची मदत घेतली जाईल. एवढेच नाही तर आता व्यापक पातळीवर एनटीआरओ सुरक्षा यंत्रणांना रियल टाइम माहिती देऊन मदत करेल.