गडचिरोली - छत्तीसगढच्या दंतेवाडा परिसरात काल नक्षलवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला २४ तास उलटत नाहीत तोवर आज गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी आणखी एक हल्ला केला. एटापल्ली तालुक्यातील जंबिया गट्टा परिसरातील मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यात आले. हे कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत पायी चालत जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला आहे.
सीआरपीएफच्या १९१ बटालियनच्या पथकावर हा हल्ला करण्यात आला असून हे पथक मतदान केंद्रावर जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवत होते. दंतेवाडा परिसरात काल संध्याकाळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला. तसेच उद्या गडचिरोलीत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.