गडचिरोली - गेल्यावर्षी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी ३६ वाहनांची जाळपोळ करून भीषण भूसुरूंग स्फोट घडविला होता, त्या घटनेतील तीन सूत्रधारांपैकी एक असलेला जहाल नक्षलवादी दिनकर गोटा आणि त्याची पत्नी सुनंदा यांना पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.४) अटक केली. दिनकर हा उत्तर गडचिरोली आणि कोरची दलमच्या विभागीय समितीचा सदस्य आहे. त्याच्यावर १६ लाख तर कोरची दलमची सदस्य असलेली त्याची पत्नी सुनंदा हिच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहायक पो.अधीक्षक मनिष कलवानिया, गडचिरोलीचे एसडीपीओ सूदर्शन आणि कुरखेडाचे एसडीपीओ तथा तपास अधिकारी जयदत्त भवर उपस्थित होते.
१ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे पहाटे नक्षलवाद्यांनी ३६ वाहने जाळल्यानंतर त्याच मार्गावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान आणि एका खासगी वाहनचालकाला जीव गमवावा लागला होता. भूसुरूंगाच्या घटनेचा तपास नंतर राष्टीय तपास संस्थेने हाती घेतला तर वाहनांच्या जाळपोळीचा तपास जिल्हा पोलीस दलाकडेच आहे. दोन्ही घटनेतील बहुतांश आरोपी सारखेच असले तरी जाळपोळीच्या घटनेसंदर्भातील ही पहिलीच अटक आहे. जवळपास ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून पोलीस दिनकरच्या मागावर होते, अशी माहिती पो.अधीक्षक बलकवडे यांनी दिली.या गुन्ह्यांत होता सहभाग२००५ मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सहभागी झालेला दिनकर गोटा नंतर बढती होत चातगाव दलम सदस्य, टिपागड दलमचा एरिया कमिटी मेंबर, धानोरा दलम कमांडर, टिपागड दलम एरिया कमिटी सचिव, कोरची दलममध्ये उत्तर गडचिरोली डिव्हीजनच्या विभागीय समितीच्या सदस्य पदावर जाऊन पोहोचला होता. जिल्ह्याच्या उत्तर भागात त्याची पकड होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १०८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात ३३ खुनांचा समावेश आहे. नक्षली सुनंदा कोरेटी हिच्यावर ३८ गंभीर गुन्हे आहेत. ती दिनकरची दुसरी पत्नी म्हणून वावरत असून पहिल्या पत्नीने यापूर्वीच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.खोब्रामेंढा जंगलात चकमकदरम्यान बुधवारी सकाळी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढाच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. मोठ्या संख्येने असलेल्या नक्षलवाद्यांचे तिथे शिबिर सुरू होते. पोलिसांची संख्या कमी असली तरी त्यांनी काही वेळ नक्षलवाद्यांना तोंड दिले. पण नक्षलवाद्यांची संख्या जास्त असल्यामुळे पोलिसांना अजून पुढे जाणे शक्य झाले नाही. काही नक्षली साहित्य मात्र पोलिसांच्या हाती लागले. संध्याकाळपर्यंत पोलीस पथक जंगलातून परत आलेले नव्हते, मात्र कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.