गडचिरोली - भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या गुंडूरवाही व पुलनार या दोन गावांच्या मध्ये असलेल्या जंगलात पोलिसांचे सी-६० पथक व नक्षलवादी यांच्यात शनिवारी सकाळी चकमक झाली. यात दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या. त्यापैकी एक डिव्हीजनल कमिटी सदस्य आहे. या चकमकीपूर्वी नक्षल्यांनी स्फोट घडविला, पण पोलिसांचे कोणतेही नुकसान झाले नाही.रामको नरोटी व शिल्पा दुर्वा अशी ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत. रामको ही नक्षली नेता भास्कर याची पत्नी आहे. ती डिव्हीजनल कमिटी सदस्य म्हणून नक्षल चळवळीत कार्यरत होती. तिच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. शिल्पा ही दलम सदस्य होती. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस होते, असे पोलिसांनी सांगितले.सी-६० जवानांकडून नक्षल शोधमोहीम राबविली जात असताना गुंडूरवाही व पुलनार या दोन गावांच्यामध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी सी-६० पथकावर गोळीबार केला. प्रत्त्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता, दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले. या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. घटनेची माहिती मिळताच जवानांना मदत करण्यासाठी गडचिरोलीवरून हेलिकॉप्टर पाठविण्यात आले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच दोन नक्षली दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
लाकडी बीटला लावली आगदरम्यान एटापल्लीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या पंदेवाही ते ताटीगुडम गावादरम्यान वनविभागाच्या लाकडाच्या बीटला नक्षलवाद्यांनी शनिवारी पहाटे आग लावली. यामध्ये जवळपास १५ लाकडी बिट जळून खाक झाले.