मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्जची विक्री करत दहशतवादासाठी हवालामार्गे फंडिंग करत असल्याची धक्कादायक माहिती एनसीबीच्या चौकशीतून समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत हस्तकांनी तब्बल १,५०० कोटींचे ड्रग्ज विकले आहे. यात, शुक्रवारीही एनसीबीने डोंगरीत छापे टाकून आणखी एका हस्तकाला अटक केली.एनसीबीने गुरुवारी डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत गँगस्टर परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाणला घनसोली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून वरील धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली. या डायरीतून दाऊदच्या देशभरातील कनेक्शनचा लेखाजोखा असल्याचेही समोर आले. यात, ड्रग्ज तस्करीसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागली असून, अनेक तस्करांचे आणि सेवन करणाऱ्यांची नावे समोर आली. यामध्ये काही उद्योगपती आणि सेलिब्रिटींच्याही नावाचा समावेश आहे. यांच्याकडेही एनसीबी लवकरच चौकशी करेल.गेल्या अनेक महिन्यांपासून दाऊदला या ड्रग्ज विक्रीतून हवालामार्गे पैसे पाठविण्यात येत होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
दहशतवादासाठी ही फंडिंग सुरू होती. गेल्या पाच वर्षांत तब्बल १,५०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची विक्री करण्यात आली आहे. शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पुन्हा डोंगरी परिसरात ४ ठिकाणी छापे टाकले. यात दाऊदच्या ड्रग्स अड्ड्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. दाऊदच्या आणखी एका हस्तकला अटक केल्याचा दावा वानखेडे यांनी केला.
दाऊदच्या हस्तकांच्या संपत्तीवरही येणार टाच- ड्रग्स तस्करी करुन दाऊदच्या हस्तकांनी कमावलेली संपत्तीबाबतही तपास सुरु असून त्यावरही लवकरच कारवाई करणार असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले. गोल्ड स्मगलिंगची चेन तोडल्यानंतर दाऊदने ड्रग्जचा धंदा सुरू केला. - मुंबईतून दाऊदची ड्रग्जच्या धंद्यातील दहशत संपवणार असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. याच कारवाईमुळे वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.