Video : NCB आणि BJP संगनमताची मविआ सरकारकडून चौकशी झाली पाहिजे; सचिन सावंतांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 03:36 PM2021-10-06T15:36:09+5:302021-10-06T16:12:10+5:30
काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील एनसीबी आणि भाजपा यांच्यातील संगनमतावर आक्षेप घेतला आहे.
क्रूझवर छापा टाकून एनसीबीनं आर्यन खानला अटक केली. यावेळी एका व्यक्तीनं त्याच्यासोबत फोटो काढला. त्या व्यक्तीचा आणि आर्यन खानचा एक सेल्फीदेखील व्हायरल झाला. मात्र तो आमचा अधिकारी नव्हताच, असं एनसीबीनं सांगितलं. मग हा व्यक्ती कोण होता? तो आर्यन खानसोबत काय करत होता? एनसीबीनं याची उत्तरं द्यायला हवीत, असे अनेक सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. त्यानंतर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील एनसीबी आणि भाजपा यांच्यातील संगनमतावर आक्षेप घेतला आहे.
सावंत यांनी NCB आणि भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर "पोलीस" पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
NCB व भाजपमधील संगनमताची मविआ सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर "पोलीस" पाटी कशी? NCB ने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का? pic.twitter.com/riyLPZKiQQ
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 6, 2021
क्रूझ शिप ड्रग्ज पार्टीवरील कारवाईबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संशय व्यक्त करत एनसीबीच्या संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एनसीबीच्या कारवाईवेळी भाजपचा पदाधिकारी काय करत होता? भाजप आणि एनसीबीचा नेमका संबंध काय? असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केले. आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा मलिक यांनी केला. त्यांनी या व्यक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतचे फोटो देखील दाखवले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीने एनसीबीच्या कारवाईत अनेक संशयाचे जाळे निर्माण केले आहे.