क्रूज ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना आज अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) उत्तर दिले. नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. क्रूजवर २ ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि कारवाई ही कायदेशीर नियमांनुसारच होती. छाप्यादरम्यान १४ जणांना कलम ६७ च्या नोटिशीनुसार ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पुराव्याच्या आधारे त्यातील आठ जणांना अटक केली होती, तर इतरांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते. एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे, असा खुलासा एनसीबीचे एडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा बेछूट आरोप केला. मात्र, या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एनसीबीने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.
तसेच ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, NCB भारतातून अंमली पदार्थ हद्दपार करत आहे. मुंबई NCB टीमने मोठी कारवाई केली. क्रुझ पार्टीवर आम्ही कारवाई केली. यात ८ जणांना अटक केली तर ९ साक्षीदार होते. यांना NCB कधीच ओळखत नव्हती. मनिष भानुशाली यांना आरोपींना घेवून जाण्यास कोणीही आदेश दिले नव्हते. कॅमे-याची गर्दी होती म्हणुन त्यांनी आरोपींना नेले असं त्यांनी आम्हाला सांगितले. सगळ्या प्रक्रिया कायदेशीररित्या पार पाडल्या गेल्या. तपासात आढळलेल्या पुराव्यांमुळे न्यायालयाने आरोपींना NCB कोठडी सुनावली होती. विविध प्रकारचे अंमली पदार्थ सापडले होते. NCB वर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कारवाई दरम्यान तात्काळ साक्षीदार तयार करावे लागतात.
२ तारखेआधी म्हणजेच कारवाई आधी या साक्षीदारांना कधीच ओळखत नव्हतो. एकूण १४ जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन एनसीबी कार्यालयात आणले गेले. यापैकी ६ जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले. या कारवाईनंतर ६ ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाई १० जणांना अटक केली गेली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते. किरण गोसावी यांनी जे सांगितले तेच आम्ही नोंदवले. तसेच एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी NCB कोणताही राजकीय पक्ष आणि जात, धर्म पाहून काम करत नाही असे स्पष्ट केले. सोडण्यात आलेल्या ६ जणांची नावे देता येणार नाही. प्रकरण कोर्टात सुरु आहे. आम्ही पुराव्याच्या आधारावर बोलतो. आम्हाला जे काही बोलायचे ते कोर्टात बोलणार. कोर्ट सांगेल त्याप्रमाणे आम्ही करू असे वानखेडे यांनी पत्रकारांना सांगितले.