मुंबई - एनसीबीच्या एका पथकाने ड्रग्स पार्टीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान जहाजामध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून जहाजामध्ये गेले. त्यानंतर गेल्या सात तासांपासून ही कारवाई सुरू आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कार्डेलिया या जहाजावर ग्रीन गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. (NCB raids drug party on luxury ship, arrests 10 including Bollywood actor's son)
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली आहे. ते आपल्या टीमसह मुंबईमध्ये संबंधित जहाजामध्ये दाखल झाले होते. दरम्यान, हे जहाज समुद्रात पोहोचल्यावर तिथे ड्रग्स पार्टीला सुरुवात झाली. या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन होत होते. त्याचवेळी एनसीबीच्या टीमने कारवाई सुरू केली. एनसीबीचे पथक प्रवासी बनून गेल्याने या कारवाईची कुणकुण कुणालाही लागली नाही. तसेच सर्व आरोपींना रंगेहाथ पकडण्यात मदत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर २ व ३ ऑक्टोबरसाठी मुंबई-गोवा-मुंबई ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. आज रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, एनसीबीने या कारवाईवेळी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेतले. त्याशिवाय १० अन्य आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीकडून पहिल्यांदाच जहाजावरील ड्रग्स पार्टीचा भांडाफोड करण्यात आल्याने ही कारवाई अधिक मोठी मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या जहाजाचे हल्लीच अनावरण झाले होते. तसेच त्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपली कला सादर केली होती.
आता रविवारी या पार्टीमध्ये पकडल्या गेलेल्या सर्व आरोपींना मुंबईत आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या सात तासांपासून एनसीबीचे पथक भर समुद्रात ही कारवाई करत आहे. एनसीबीने याआधी अनेकवेळा कारवाया केल्या आहेत. मात्र अशा प्रकारचे सिक्रेट ऑपरेशन हे क्वचितच केले जाते. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्टीदरम्यान, एनसीबीचे पथक जहाजावर आहे याची माहिती कुणालाही नव्हती. त्यामुळेच आरोपी अधिक बिनधास्त होते. त्यामुळे ते सहजपणे एनसीबीच्या जाळ्यात सापडले.