Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai cruise drugs case) आता नवे अपडेट्स समोर येत आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकानं (NCB) आता आर्यन खानच्या बँक खात्यातील व्यवहारांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी आर्यन खान यानं त्याच्या बँक खात्यातून कोणता व्यवहार केला आहे का याची तपासणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जर तसं केलं असेल तर आर्यन खाननं नेमकं कोणत्या खात्यात आणि किती पैसे वळते केले होते? कोणत्या व्यक्तीला आणि कशासाठी पैसे दिले गेले याची सविस्तर चौकशी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आज सकाळी एनसीबीनं मागणी केलेल्या कागदपत्रांचा लिफाफा घेऊन एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानकडून आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्याच संदर्भातील कागदपत्रं आज एनसीबीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आर्यन विरोधात सबळ पुरावे जमा करण्याचं काम एनसीबीकडून केलं जात आहे. आर्यन खानला जामीन नाकारण्यासाठीची जोरदार तयारी एनसीबीकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अभिनेत्री अनन्या पांडेचा मोबाइल व लॅपटॉपही याच प्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. तिच्या दोन्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्या आहेत. आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यात व्हॉट्सअॅप चॅट दरम्यान ड्रग्ज खरेदी प्रकरणी संभाषण झाल्याचा संशय एनसीबीला आहे. याच मुद्द्यावरुन अनन्या पांडेचीही चौकशी केली जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या पांडे हिनं आर्यन खान याला गांजाचं सेवन करताना पाहिलं असल्याची कबुली एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर दिली आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात एका मित्राच्या माध्यमातून गांजा उपलब्ध करुन दिला होता. पण तो कोणत्या ड्रग पेडलकर करुन याचा पुरवठा करण्यात आला याची कल्पना नसल्याचं अनन्यानं म्हटलं आहे. अनन्या पांडेची सोमवारी पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.