मुंबई - ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) समन्स बजावले आहेत. एनसीबी अधिकाऱ्याने यासंदर्भातली माहिती ‘एएनआय’शी बोलताना दिली. याआधी अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.
अर्जुन आणि गॅब्रीएला यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापेमारी केली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला होता. त्याआधी एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ देखील जप्त केले होते. तसेच अर्जुन रामपाल याची देखील एनसीबीने दोनदा चौकशी केली आहे. त्यानंतरअर्जुन रामपाल एनसीबीविरोधात दावा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आपल्या घरी सापडलेली दोन्ही औषधं डॉक्टरांनी दिलेली असल्याचा अर्जुनने दावा केला आहे. एनसीबीने छाप्यात आपल्या बहिणीची औषधे आणि कुत्र्याची औषधे जप्त केली असल्याचं अर्जुनने म्हटले आहे.
अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करण्याची आली. ही चौकशी सुमारे सहा तास चालली. त्यामध्ये प्रामुख्याने रामपाल हा ड्रग्ज घेणारा ग्राहक आहे की ते पुरवणाऱ्या दलालांच्या टोळीतील सदस्य, याबाबत माहिती घेण्यात आली होती. या प्रकरणी अर्जुनला दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते, त्याला एनसीबीने २१ डिसेंबर रोजी समन्स बजावले होते. अर्जुन रामपालची १६ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांची काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे एनसीबीने जप्त केली आणि फॉरेन्सिक्स तपासासाठी पाठविली होती.