मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा, आर्यन खानशी (aryan khan) संबंधित ड्रग्स प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी एनसीबीने शाहरुखच्या ड्रायव्हरची बराच वेळ चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना क्रूझ टर्मिनलवर सोडल्याचे ड्रायव्हरने कबूल केले आहे.
यासंदर्भात करण्यात आली ड्राइव्हरची चौकशी - एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवले होते. यानंतर त्याचीही ड्रग्स प्रकरणात सुमारे 12 तास चौकशी करण्यात आली. एनसीबीने आर्यन खान आणि त्याच्या मित्रांसंदर्भात ड्रायव्हरची चौकशी केली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने कबूल केले आहे, की त्याने आर्यन आणि अरबाज यांना क्रूझ टर्मिनलवर सोडले. एनसीबीने ड्रायव्हरचा जबाबही नोंदवला आहे.
एनसीबी आर्यनच्या जमिनाला करणार विरोध -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात एनसीबी शाहरुख खानच्या ड्रायव्हरचा जबाब न्यायालयात वापरणार असल्याचे समजते. एवढेच नाही, तर एनसीबी आर्यन खानच्या जामिनाला न्यायालयात अनेक पुराव्यांनीशी विरोधही करणार आहे.
एनसीबीचा तपासात झालाय मोठा खुलासा - एनसीबीच्या तपासात असेही समोर आले आहे, की आर्यन खान, अरबाज मर्चंट, प्रतीक गाबा आणि आणखी एक जण मन्नतमधून सोबतच मर्सिडीज कारने निघाले होते. NCBच्या मते, हे सर्व जण क्रूझ पार्टीसाठीच निघाले होते. क्रूझ पार्टीच्या काही दिवस आधीच, ड्रग्ससंदर्भात बोलणेही झाले होते. याचे पुरावेही एनसीबीला मिळाले आहेत. हे एक षडयंत्र होते आणि याच माहितीनंतर NCB ने NDPS चे सेक्शन -29 FIR मध्ये जोडले. NCB ने आणखी ठोस माहितीसाठी ड्रायव्हरचा जबाबही नोंदविला आहे.