जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या १५ दिवसांपासून एकापेक्षा एक गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) बॅकफूटवर आला आहे. गेल्या आठवड्यापासून एकही कारवाई केलेली नसून कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपासही रोडावला आहे. त्यामध्ये अभिनेत्री अन्यन्या पांडे हिच्याकडील चौकशी पूर्ण करण्यात आलेली नाही.
एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याबद्दल तसेच खंडणी, लाचखोरी आणि बोगस कारवायांबद्दल झालेल्या आरोपांमुळे देशभरात एनसीबी सध्या वादाचा विषय बनली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीमध्ये कारवाई न करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याबाबत मुंबई विभागाला सक्त सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
एनसीबीचे अधिकारी स्वत:च ड्रग्ज प्लांट करतात, पैसे उकळतात अशा स्वरूपाच्या २६ केसेसच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर कारवाया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी झाली आहे. त्यानंतर तिला पुन्हा सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र रविवारी पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने शपथपत्राद्वारे वानखेडेवर आरोप केले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनन्याचे समन्स रद्द करण्यात आले. त्यानंतर तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. तसेच पुढे नवा गुन्हाही दाखल झालेला नाही. जुन्या गुन्ह्यातील आरोपीही शोधले जात नाहीत.
कारवाई करताना यापुढे दक्षता घ्या...nएनसीबीच्या मुंबई पथकाने कार्डेलिया क्रूझवर केलेल्या कारवाईसह गेल्या वर्षभरात केलेल्या काही कारवायांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. काही पंच साक्षीदार उघडपणे फितूर झाले आहेत. त्यामुळे यापुढे कारवाई करताना सर्व बाबींची योग्य दक्षता घेण्याच्या सूचना महासंचालक एस. बी. प्रधान यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.nसर्व आरोपांनंतर एनसीबीची कारवाई ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस कारवाई न करण्याची सूचना दिल्लीतील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रभाकर साईल, गोसावीच्या जबाबाविनाच एनसीबीची समिती दिल्लीला रवानाक्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबईला आलेली उच्चस्तरीय चौकशी समिती शनिवारी दिल्लीला रवाना झाली. विशेष म्हणजे एनसीबीवर आरोप करणाऱ्या पंच प्रभाकर साईल व या प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी यांची चौकशी न करताच ते माघारी परतले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काढण्यात आलेल्या निष्कर्षाबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती गेले चार दिवस मुंबईत होती. समीर वानखेडे यांच्यासह कारवाईतील सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि साईल व गोसावी वगळता अन्य पंचाचे जबाब नोंदविले आहेत. ही समिती आपला अहवाल एनसीबीचे महासंचालक एस. बी. प्रधान यांच्याकडे सुपुर्द करणार आहे.
समितीने मुंबईत आल्यानंतर बुधवारी समीर वानखेडे यांच्याकडे सुमारे साडेचार तास चौकशी करून सविस्तर जबाब नोंदविला. मात्र फरारी असलेल्या गोसावीला पुणे पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतल्याने त्याचा जबाब समितीला घेता आला नाही, तर साईल याला कायदेशीर पध्दतीने समन्स न बजविल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. त्यामुळे तो जबाब नोंदविण्यासाठी हजर झाला नसल्याचे सांगितले.