नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) यापुढे सहापैकी तीन प्रकरणांचीच चौकशी करणार आहे. टीमने अन्य तीन प्रकरणांचा तपास रद्द केला आहे. यामुळे एसआयटी समीर खान, आर्यन खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांचीच चौकशी करणार आहे. आयजी रँकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही चौकशी केली जात आहे.
समीर खान हा एनसीबीचे मंत्री नवाब मलिक यांचा जावई आहे. या प्रकरणी आधीच चार्जशिट दाखल झाली आहे. मुंबईजवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर एनसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. याशिवाय इतरांना देखील अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. या कारवाईनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेवर अनेक आरोप केले. त्यानंतर वानखेडे यांना ड्रग्ज प्रकरणातील खटल्यातून हटवण्यात आले होते. एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आता तीन प्रकरणे वगळली आहेत.
एसआयटीकडे एकूण सहा प्रकरणे वळती करण्यात आली होती. एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंग्रजी प्रसार माध्यमांना सांगितले की, एसआयटी आता तीन प्रकरणांचीच चौकशी करेल. अन्य तीन प्रकरणांमध्ये कोणी हाय प्रोफाईल व्यक्ती नाही. तसेच मुंब्रा, जोगेश्वरी आणि नागपाड्यात किरकोळ स्वरुपात अंमली पदार्थ जप्त झाल्याचे गुन्हे नोंद झाले आहेत. परदेशात काही लिंक असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत.