लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी नंदा भिंगारदिवे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. पाेलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आराेप कुटुंबीयांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून चौकशीची मागणी केली आहे.
पाेलिसांनी आरोप फेटाळून लावले असून, सीसीटीव्ही उपलब्ध असून सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. पाेलिसांचे शुक्रवारी रात्री ऑल आउट ऑपरेशन सुरू हाेते. या कारवाईत भिंगारदिवे यांचा मुलगा प्रशिक याला पोलिसांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आणले होते. हे कळताच दीपक हे मुलाला का पकडले, याची विचारणा करण्यासाठी पाेलिस ठाण्यात पाेहाेचले.
मुलाची चौकशी सुरू असताना त्यांनी मोबाइल शूटिंग सुरू केले. या कारणावरून पोलिस आणि दीपक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळातच दीपक यांना फिट आली. पोलिसांनी त्यांना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले.
सीआयडी तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजदीपक यांच्या कुटुंबीयांचे आराेप पोलिसांनी फेटाळले आहेत. या प्रकरणाची सीआयडी चौकशी हाेणार असल्याचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत सर्व फुटेज आहे. सीसीटीव्ही फुटेज सीआयडीकडे तपासासाठी देण्यात येतील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक पंचनामे ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ठाणे यांच्या समक्ष केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दीपक यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असल्याचा आराेप केला आहे. त्यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत. आम्हाला न्याय पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत दीपक यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.