न्याय हवाय! सेक्स करता आला नाही, आदिवासी तरुणाने सरकारवर ठोकला १० हजार कोटींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:21 PM2023-01-04T13:21:35+5:302023-01-04T13:22:20+5:30
पोलिसांनी बळजबरीने खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप, कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागला... आदिवासी तरुण, त्याच्या वकिलाने ठोकला हजारो कोटींचा दावा
मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एका आदिवासी तरुणाने सरकारवर दहा हजार कोटींचा दावा ठोकला आहे. याचे कारणही आहे, तरुणाला एका सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. नंतर त्याला दोषमुक्त करण्यात आले. यावर त्याने एवढी प्रचंड नुकसान भरपाई मागितली आहे.
कांतीलाल भील उर्फ कंतू याने हा दावा ठोकला आहे. त्याला ६६६ दिवस म्हणजेच जवळपास दोन वर्षे तुरुंगात रहावे लागले बोते. खोट्या आरोपांखाली तुरुंगात राहिला आणि या काळात त्याला शरीर संबंधांपासून वंचित रहावे लागले. सेक्सचा आनंद घेता आला नाही, यामुळे सरकारने मला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कंतूने केली आहे. कंतू ऑक्टोबर २०२२ मध्ये तुरुंगाबाहेर आला होता.
कंतूचे वय ३५ वर्षे आहे. खोट्या आरोपांमुळे कंतूला तुरुंगात जावे लागले, यामुळे त्याचे जगच पूर्णपणे बदलून गेले आहे. त्याची पत्नी, मुले आणि वृद्ध आईला अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. अंतर्वस्त्रे खरेदी करण्यासाठी देखील त्यांच्याकडे या काळात पैसे नव्हते. तुरुंगातही त्याला कपड्यांशिवाय थंडी, उकाड्यात रहावे लागल्याचा आरोप कंतूने केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून मला त्रास दिला जात आहे. तीन वर्षे पोलीस त्रास देत होते. यानंतर दोन वर्षे तुरुंगात जावे लागले. तिथेही तुरुंगातील त्रास सहन करावा लागला. माझे कुटुंब रस्त्यावर आले. मुलांसाठी अन्न धान्याची सोयही करता येत नाहीय. पोलिसांनी बळजबरीने खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप कंतूने केला आहे.
कांतीलालचे वकील विजय सिंह यादव यांनी सांगितले की, मानवी जीवनाचे कोणतेही मुल्य ठरविता येत नाही. पोलिस आणि राज्य सरकारमुळे कंतूचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात राज्य सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई मीरा, पत्नी लीला आणि ३ मुले आहेत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. भूकबळीची परिस्थिती त्याच्या कुटुंबावर आली, मुलांचा अभ्यास राहिला. समाजात पुन्हा जाण्यासाठी त्याला त्रास होत आहे, यामुळे हा दावा दाखल केल्याचे वकिलांनी म्हटले आहे.