नागपूर : राजकारणाच्या आडून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याची साथीदार नीलिमा जयस्वाल (तिवारी) हिला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी वर्धा येथे ताब्यात घेतले. बनावट कागदपत्रांच्या आधारे मृत महिलेच्या मालमत्तेवर कब्जा मारणाऱ्या साहिल सय्यद, नीलिमा जयस्वाल आणि साथीदारांविरुद्ध पाचपावली पोलिसात १३ जुलैला गुन्हा दाखल झाला होता.
रवीशंकर पुरूषोत्तम सहारे वैशालीनगर असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. त्यांनी वैशाली नगरातील एमआयजी कॉर्टरमध्ये राहणाऱ्या वसुधा वासुदेव रुपदे यांच्याकडून काही वर्षांपूर्वी स्थावर मालमत्ता विकत घेतली होती. वसुधा रुपदे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचे बनावट कागदपत्र तयार करून आरोपी साहिल, निलिमा, गिरिश गिरीधर आणि साथीदारांनी मृत वसुधा यांच्या बनावट सह्या कागदपत्रावर केल्या. त्या आधारे या लाखोंच्या मालमत्तेवर कब्जा मारला. सहारे यांना मारहाण करून धमकी देत हाकलून लावले. २९ नोव्हेंबर २०१९ ला हा गैरप्रकार घडला होता. मात्र आरोपींनी तत्कालीन पोलिसांना हाताशी धरून हे प्रकरण दडपले होते. दरम्यान, १० जुलै २०२० ला साहिलच्या वादग्रस्त ऑडिओ क्लीप पोलिसांकडे पोहचल्या. यातील एका क्लिपमध्ये हनी ट्रॅप आणि पाचपावलीसह शहरातील तीन ठिकाणच्या मालमत्ता बळकावण्याचे खळबळजनक संभाषण होते. या क्लिपचे संभाषण शब्दशः प्रकाशित करून लोकमत'ने खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी १३ जुलैला गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी साहिलची खास साथीदार नीलिमा जयस्वाल (तिवारी) आणि गिरीश पद्माकर गिरीधर फरार होते. तब्बल १८ दिवसानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांना नीलिमा वर्धा येथे साहिलच्या नातेवाईकाकडे दडून असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वातील एक पथक सावंगी वर्धा येथे पोहचले आणि शुक्रवारी निलीमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी तिला नागपूरात आणण्यात आले.साहिलच्या भावालाही अटकपोलिसांनी निलीमाला फरारी च्या काळात लपून राहण्यास मदत करणारा साहिल सय्यद याचा भाऊ तोफिक यालाही अटक केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...
रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल