लातूर - नीट गुणवाढीसंदर्भात लातुरात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील निसटलेला आराेपी इरण्णा काेनगलवार याच्या माेबाइलवर वारंवार काॅल करणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. गुन्हा दाखल करण्यापूर्वीचा माेबाइल ‘सीडीआर’ पाेलिसांनी काढला आहे. एकाच क्रमांकावरून सातत्याने केलेल्या माेबाइल क्रमांकाची चाैकशी केली जाणार आहे. संशयास्पद वाटणाऱ्या माेबाइल क्रमांकावरून गुन्ह्यातील इतर सहभागी असलेल्या एजंटापर्यंत पाेहोचण्यासाठी पाेलिस प्रयत्न करत आहेत.
नीटमध्ये गुण वाढविण्याच्या कामासाठी पालक-विद्यार्थ्यांकडून राेख रक्कम आणि प्रवेशपत्रे व्हाॅटसॲपवर घेतली आहेत. यातून काेट्यवधींची माया जमविण्याचे आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण, शिक्षक संजय जाधव यांचे हाेते. इरण्णाने दिल्लीतील गंगाधरसाेबत जाेडलेले कनेक्शन त्यांना पाठबळ देत हाेते. इरण्णाच्या संपर्कातील लातुरातील दाेघे नांदेड एटीएसच्या गळाला लागले अन् नीट गुणवाढीसंदर्भातील कारनाम्यांचा भंडाफाेड झाला. मार्च-एप्रिल आणि मे महिन्यात इरण्णाच्या माेबाइलवर किती जणांनी काॅल केले. काेण-काेण संपर्कात आले याचाही शाेध तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे.
इरण्णाचा नांदेड जिल्ह्यातही वावर...
नांदेड जिल्ह्यातील देगलूर हे इरण्णा काेनगलवारचे मूळ गाव असून, गेल्या काही वर्षांपासून ताे लातुरात वास्तव्याला आहे. लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात इरण्णाचा वावर असल्याचा संशय बळावला आहे. नांदेड जिल्ह्यातील काही एजंटांचा आता पाेलिस शाेध घेत असून, काेण-काेण संपर्कात आले? अशांचीही स्वतंत्र यादी केली जात आहे. अनेक एजंट त्याच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
‘नीट’साठी तयार केले एजटांचे नेटवर्क?
तपास यंत्रणांच्या हातून निसटलेल्या इरण्णाने लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड जिल्ह्यात नीटमध्ये गुण वाढविण्याच्या कामासाठी विश्वासू एजंटांचे नेटवर्क तयार केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. अटकेतील शिक्षकांकडे आढळून आलेल्या यादीत लातूर आणि बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आहेत. इरण्णा हाती लागला तर ‘त्या’ एजंटांचा सुगावा लागणार आहे. यासाठी सर्वच पैलूंनी पाेलिस, नांदेड एटीएस तपास करीत आहे.
‘सायबर क्राइम’च्या हाती लागणार डेटा...
नीट प्रकरणात दाखल असलेल्या चारही आराेपींचे नेटवर्क आणि माेबाइल ‘सीडीआर’च्या माध्यमातून तपासले जात आहे. यातून हाती येणारी माहिती तपासाला दिशा देणारी ठरणार आहे. ‘सायबर क्राइम’कडून जानेवारी ते जून महिन्यातील काॅल डिटेल्स, व्हाॅटस्ॲप चॅटिंग व इतर डेटांचाही तपास केला जात आहे.