काठमांडू: नेपाळच्या मुगु जिल्ह्यात आज मोठा अपघात झाला. बस अपघातात (Nepal Bus Accident) कमीत कमी 28 जणांचा मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, नेपाळगंजहून मुगु जिल्ह्याचे मुख्यालय गमगाधीला ही बस जात होती. यावेळी पिना झयारी नदीमध्ये ही बस कोसळली.
बसमधील प्रवासी दुर्गा पुजेनिमित्ताने आपल्या घरी परतत होते. सुरखेतहून नेपाळी सैन्याचे हेलिकॉप्टर मदतीसाठी पोहोचले आहे. मुगु हे काठमांडूहून 650 किमी उत्तर पश्चिमेकडे रारा तलावासाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे. बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. मुगुच्या मुख्य जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, 24 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जणांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. बस कर्मचाऱ्यांसह 42 प्रवासी होते.
जखमींपैकी 14 जणांना हेलिकॉप्टरद्वारे नेपाळगंजला हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक हे विद्यार्थी आणि मजूर आहेत. हे सारे सणासाठी भारतातून परतले होते. जिल्हाधिकारी महत यांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये बसचा टायर फुटल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस मोठ्या उंचीवरून दरीमध्ये घसरत नदीमध्ये पडली. सोमवारी कास्की जिल्ह्यामध्ये जीप अपघातात आठ लोकांचा मृत्यू झाला होता.