बीड - शेअर मार्केटमध्ये दाम दुप्पट मिळवून देण्याचं आमिष दाखवून भाच्याने आपल्या मामाकडून सत्तर लाख रुपये उकळल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. मामाची फसवणूक करून त्याच पैशावर भाच्याने गोव्यात मौजमजा देखील केली.
सय्यद तलहा सय्यद जमाल, यश गायकवाड यासह आणखी एकाला बीड सायबर पोलिसांनी बड्या शिताफीने अटक केली आहे. बीडमधील व्यापारी शेख इसाक शेख महमूद यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तलहा सय्यद हा त्यांचा नातेवाईक त्यानेच शेख यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवून जुलै २०२२ मध्ये ऑनलाइन १५ लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर इतरांकडून उसनवारी करत ५५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले गेले. दरम्यान याच पैशांवर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपींनी गोव्यामध्ये गर्लफ्रेंडसोबत मौजमजा केली आहे.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणी बीड सायबर पोलीस अधिक तपास करीत आहे. आणखी आरोपींना अटक केली जाणार आहे. या तिघांना अटक केल्यानंतर गर्लफ्रेंडला समज देऊन पोलिसांनी तिला घरी पाठवून दिले आहे.