मेरठ – उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं भररस्त्यात एका युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं उघड झाले आहे. काकाने मालमत्तेच्या वादातून पुतण्यावर जीवघेणा हल्ला केला. पुतण्याच्या मृत्यूपर्यंत निर्दयीपणे चाकूने भोसकण्यात आले. भररस्त्यात हा सगळा प्रकार घडत होता. मात्र युवकाला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. गुन्हेगारांना रोखण्याची कुणालाही हिंमत झाली नाही. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शहराच्या लिसाडी गेट परिसरात राहणारा साजिद रविवारी एका कामानिमित्त बह्मपुरी येथील इत्तेफाक नगर येथे गेला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ३ लोकांनी साजिदला पकडले आणि त्याच्यावर चाकूने वार केले. चाकू लागल्याने साजिद गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. त्यानंतरही जखमी साजिद उठवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याला जिवंत पाहून पुन्हा चाकूने भोसकलं आणि त्याचा गळा कापला. भररस्त्यात घडलेल्या घटनेने लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी साजिदला हॉस्पिटलला नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. युवकावर भररस्त्यात चाकूने वार होत होते परंतु त्याठिकाणी उपस्थित एकानेही गुन्हेगारांना रोखण्याची हिंमत केली नाही. इतकेच नाही तर घटनेनंतर आरोपींना पकडण्यातही आले नाही. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साजिदचं काकासोबत संपत्तीवरून वाद सुरू होता. चाकूने हल्ला करणारे साजिदचे ३ काका शाहजाद, नौशाद आणि जावेद होते. हत्या करणारे फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतले आहे.
मेरठचे एसपी सिटी विनीत भटनागर म्हणाले की, स्थानिक लोकांनी जर विरोध केला असता तर हा गुन्हा घडला नसता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३ आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. मृत युवक आणि आरोपींमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. सुरुवातीच्या तपासात एका प्लॅटचा हा विवाद होता. आरोपींची ओळख पटवली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. लवकरच या आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.