सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सावंतवाडी जंगलात काही महिन्यांपूर्वी एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली. स्थानिक गावकरी गाई चरण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले असता त्यांना हे दृश्य दिसले. त्यानंतर गावकऱ्यांनी या महिलेला सोडवलं आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनला महिलेबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. ही महिला मूळची अमेरिकेची असून तिच्या पतीने तिला इथं बांधल्याचं समोर आले होते. मात्र आता तपासात नवी माहिती उघड झाली आहे.
या तपासाबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सांगतात की, जंगलात सापडलेली महिला अमेरिकेच्या मॅसाचुसेट्समध्ये राहणारी आहे. तिथे तिचा आई आणि भाऊ आहे. अमेरिकन दूतावासाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माहिती दिली. या महिलेने बोस्टन यूनिवर्सिटीतून साइकोलॉजीचं शिक्षण घेतले आहे. योगाचं शिक्षण घेण्यासाठी ती १० वर्षापूर्वी तामिळनाडूतील के तिरुवन्नामलाई येथे आली होती. त्याआधी ती अमेरिकेत बेला डान्सर आणि योगा टीचर होती असं त्यांनी सांगितले.
तसेच महिलेजवळ सापडलेल्या आधार कार्ड, पासपोर्टची तपासणी करण्यात आली. तिचा पासपोर्ट यूएसचा आहे. आम्ही तामिळनाडू पोलिसांना माहिती दिली हे आधार कार्ड या महिलेने कसं बनवलं याचा ते तपास करत आहेत. महिलेचे लग्न आणि पतीने छळ केल्याचं खोटं आहे. आम्ही पथक तिरुवन्नामलाई येथे पाठवून त्याची खातरजमा केली. महिला अनेक वर्षापासून तिरुवन्नामलाई इथल्या चेंगम रोडवरील भाड्याच्या घरात राहायची. पैसे नसल्याने तिने २ महिन्यापूर्वी घर सोडले. त्या खोलीतून जास्त काही मिळालं नाही अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त दिलं आहे.
दरम्यान, महिलेकडील मोबाईल आणि टॅबची तपासणी केली परंतु त्यात संशयास्पद काही आढळलं नाही. महिलेने स्वत:ला साखळदंडाने बांधून चावी फेकून दिली होती. महिला ज्याठिकाणी सापडली तिथून काही मीटर अंतरावर आम्हाला चावीचे २ सेट मिळाले. सुरुवातीला महिला काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती त्यासाठी तिने कागदावर लिहून तिला कुठलेतरी इंजेक्शन दिल्याचं सांगितले. या महिलेचा दावा होता ती ४० दिवसांपासून जंगलात काहीही न खातापिता या अवस्थेत आहे. मात्र इतके दिवस कुणी विना जेवण, विना पाणी कसं राहू शकेल हे अद्याप स्पष्ट नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
महिलेच्या बोलण्यास विरोधाभास
अमेरिकन दूतावासानं प्रकरण गांभीर्याने घेत भारत सरकारला तपासात वेग आणण्यास सांगितले. त्यानंतर तपासात सिंधुदुर्ग पोलीसांचे २ पथक गोवा आणि २ पथक तामिळनाडूतील कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गेले. या महिलेने पोलिसांना सांगितले होते की, मदुरा रेल्वे स्टेशनहून तिला जंगलात आणलं गेले परंतु स्टेशनवरील सीसीटीव्हीची पडताळणी केली त्यात काहीही सुगावा लागला नाही. महिलेच्या बोलण्यात सातत्याने विरोधाभास दिसतो असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे.
याआधीही रचलं होतं नाटक, पतीची कहाणी खोटी निघाली
या महिलेने पहिल्यांदाच असं केले नाही तर याआधीही तिने साखळदंडाने बांधून घेतले होते. २०२० मध्ये महिलेने तामिळनाडूत असं करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी एका दिवसांत तिची सुटका झाली. हे प्रकरण चर्चेत आले नाही त्यामुळे माध्यमांनी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र यावेळी तिने सिंधुदुर्ग का निवडलं हे अद्याप स्पष्ट नाही. महिलेच्या आधार कार्डवर असलेल्या पत्त्यावर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सतीश नावाच्या व्यक्तीला ती ओळखत असल्याचं समोर आले. परंतु त्याबाबत काहीही पुरावा नाही. ही महिला सिंधुदुर्गच्या जंगलात कशी पोहचली याचा तपास पोलीस करत आहेत. तिची मानसिक परिस्थिती ठीक नसल्याने तिचा जबाब नोंदवला गेला नाही असं पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली.