बिहारमधील मोतिहारमध्ये एका नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या लालसेपोटी सासरच्यांनी मुलीची हत्या करून मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार सुरू केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या माहितीवरून ते स्मशानभूमीत पोहोचले आणि त्यांना पाहताच मुलीचे सासरचे लोक पळून गेले.
कुटुंबीयांनी चितेतून अर्धवट जळालेला मृतदेह उचलला आणि हरसिद्धी अरेराज मुख्य रस्ता अडवला. सासरच्यांनी तिचे हातपाय बांधून गळा आवळून खून केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. फुलपरी देवी (20) असं मुलीचं नाव होतं.
गरीब आईने मोठ्या कष्टाने आपल्या मुलीचे शिक्षण करून तिचे लग्न लावून दिले. मात्र हुंड्याच्या हव्यासाने तिचीही हत्या केली. मुलीची आई रामवती देवी यांनी सांगितले की, आपल्या मुलीचं लग्न 8 मार्च 2023 रोजी टोला गावातील रहिवासी सुभाष शर्मा यांचा मुलगा नितेश कुमार याच्याशी केले होते. लग्नानंतर त्यांची मुलगी सासरच्या घरी गेल्यापासून पाच लाख रुपये आणि बाईकसाठी तिचा छळ सुरू झाला.
लग्नानंतर सहा महिन्यांनी नवऱ्याने तिला मारहाण करून आई-वडिलांच्या घरी पाठवले. काही वेळाने जावई नितेशकुमार आला आणि मुलीला घेऊन गेला. काही दिवसांनी मुलीवर अत्याचार करून तिला घराबाहेर हाकलून दिलं. आता माहिती मिळाली की मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला जात आहे. आम्हाला पाहताच सासरचे लोक तेथून पळून गेले. तेथे आम्ही चितेतून तिचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढला.
याप्रकरणी डीएसपी रंजन कुमार यांनी सांगितले की, मुलीच्या आईकडून तक्रार मिळाली आहे की, तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या मुलीचे हात पाय बांधून हत्या केली आहे. याप्रकरणी महिलेचा पती, सासू, सासरे यांच्यासह अनेकांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.