अमरावती: हुंड्यासाठी होणारा अनन्वित छळ सहन न झाल्याने एका १९ वर्षीय नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. लग्नाच्या अवघ्या वर्षभरात ती हुंडाबळी ठरली. २७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी मृत नवविवाहितेचे पालक मोहम्मद रफिक शेख गुलाम (५२, रा. दिग्रस, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून मृताचा पती व अन्य तिघे (सर्व रा. कसाबपुरा, चांदूरबाजार) यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ व हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. ३१ डिसेंबर रोजी रात्री ७.४७ च्या सुमारास तो गुन्हा नोंदविला गेला. इकरा हाफिजा (१९) असे मृत महिलेचे नाव आहे.
आरोपींमध्ये मृताचा पती मोहम्मद शहबाज अब्दुल गफुर कुरेशी, दिर मो. जुबेर अब्दुल गफुर कुरेशी व मो.शोएब अ. गफुर कुरेशी व जाऊचा समावेश आहे. तक्रारीनुसार, मो. रफिक यांच्या इकरा नामक मुलीचा वर्षभरापूर्वी चांदूर बाजार येथील मो. शहबाज याच्याशी झाला. सुरूवातीचे काही दिवस सौख्याचे गेले. मात्र, काही दिवसानंतर तिला माहेरून हुंड्याची मागणी करण्यात आली. तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, तू खाली हात आलीस, असे टोमणे मारून तिला माहेरून हुंड्याची रक्कम आणण्याचा तगादा लावण्यात आला. पतीसह दोन्ही दीर व जावेने हुंड्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. आज ना उद्या बरे होईल, त्रास कमी होईल, या आशेपोटी ती जगत राहिली. मात्र त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. त्यामुळे २७ डिसेंबर रोजी दुपारी तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत चांदूर बाजार पोलिसांनी त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पालकांचे बयाण
आपल्या मुलीच्या आत्महत्येला तिच्या पतीसह तिचे दीर व जाऊ कारणीभूत आहेत. त्यांनीच हुंड्यासाठी तगादा लावत तिचा छळ केला. तिला आत्महत्येस बाध्य केले, अशी तक्रार मृत नवविवाहितेच्या पालकाने नोंदविली. त्या तक्रारीची पुरेसी खातरजमा केल्यानंतर चांदूर बाजार पोलिसांनी एडी दाखल केलेल्या त्याप्रकरणी शनिवारी रात्री हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या नेतृत्वात चांदूर बाजार पोलीस करीत आहेत.