मुंबई - पोलीस अधिकारी पतीकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने पीडित नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीकडून शारीरिक अत्याचारांमुळे शरीरावर झालेल्या जखमांचे फोटो माहेरच्या कुटुंबीयांना पाठवत मुलीने लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यात आपले जीवन संपवले. केरळच्या कोलम जिल्ह्यातील ही शॉकींग घटना उघडकीस आली आहे. विस्मया नायर असे मृत्यूमुखी पडलेल्या विवाहितेचं नाव आहे.
केरळ मोटर वाहन विभागात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या किरणकुमार यांच्याशी विस्मयाचा मार्च 2021 मध्ये विवाह झाला होता. लग्नात विस्मयाच्या वडिलांनी सोनं, जमीन जुमला, आलिशान गाडी यासारख्या ‘भेटवस्तू’ देऊन मुलीची पाठवणी केली. मुलगा मोठा अधिकारी असल्याने आपल्या लाडक्या लेकीची हौस पूर्ण करताना वडिलांनी सर्व सोपीस्कर पार पाडले.
विस्मयाच्या वडिलांनी दिलेली गाडी न आवडल्याने तिच्या पतीने आणखी नव्या गाडीची मागणी केली. गाडी किंवा 10 लाख रुपयांची रोकड द्यावी, अशी मागणी किरणकुमारने विस्मयाच्या कुटुंबीयांकडे केली. त्यातूनच, नवविवाहित पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. नवऱ्याचा वाढलेला त्रास सहन न झाल्याने काही दिवसांतच विस्माने पतीचे घर सोडून माहेर गाठले होते.
22 वर्षीय विस्मया बीएएमसच्या अखेरच्या वर्षाला शिकत होती. अंतिम परीक्षांच्या आधी किरणने तिला घरी येण्याची विनंती केली. आई-वडिलांच्या मर्जीविरुद्धच ती सासरी परत गेली. त्यानंतर किरणने पुन्हा तिचा गाडीसाठी छळ सुरु केला. इतकंच नाही, तर तिला पालकांशी बोलण्यासही मज्जाव केला. विस्मयाने परीक्षा देऊ नये, अशी तिच्या पतीची इच्छा होती. त्याने तिची परीक्षा फी भरण्यासही इन्कार केला. त्यामुळे विस्मयाला आपल्या आईकडे पैशांची मागणी करावी लागली.
बहिणीला पाठवले जखमांचे फोटो
रविवारी रात्री विस्मयाने आपल्या बहिणीला व्हॉट्सअॅप मेसेज करुन आपली बिकट स्थिती सांगितली. शिवीगाळ करुन पती किरण कुमार आपल्यावर शारीरिक अत्याचार करत आहे, असा आरोपही तिने मेसेजमध्ये केला होता. त्यामुळे शरीरावर झालेल्या जखमांचे फोटोही तिने बहिणीच्या मोबाईलवर पाठवले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी विस्मयाच्या मृत्युची बातमी तिच्या कुटुंबीयांच्या कानावर आली.
पती किरणकुमारला अटक
सोमवारी सकाळी विस्मयाच्या सासरहून माहेरी फोन आला. तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, नायर कुटुंबीय हॉस्पिटलला पोहोचताच विस्मयाने आत्महत्या केल्याचं सांगितलं. त्यामुळे, विस्मयाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून विस्मयाच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून किरणकुमारनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी किरण कुमारला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.