नवी दिल्ली - २९ जानेवारीला दिल्लीतील इस्राईल दूतावासाबाहेर स्फोट घडवून आणणाऱ्या संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज आता NIA ने जाहीर केले आहे. तसेच सीसीटीव्हीत दिसणाऱ्या दोन संशयितांची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी १० लाखाचे इनाम घोषित करण्यात आले आहे. इस्रायलच्या दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाचा तपास फेब्रुवारीत राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीकडे (NIA) देण्यात आला आहे. यासंदर्भात गृहमंंत्रालयाने निर्देश दिले होते.
गृहमंत्रालयाकडून आदेश मिळाल्यानंतर एनआयए संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून याचा तपास सुरू केला आहे. एनआयए अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घटनास्थळाला भेट दिली असून या प्रकरणात काहीही तपास लागला नसून, हे काम कोणी केले असावे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आता संशयितांचे सीसीटीव्ही जाहीर करून NIA ने त्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस म्हणून १० - १० लाख जाहीर केले आहेत.
२९ जानेवारीला दिल्लीच्या विजय चौकामध्ये बीटिंग दि रिट्रीट सोहळा सुरू असतानाच, तेथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट झाला होता. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती, मात्र चार-पाच वाहनांचे नुकसान झाले होते.