पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 18:01 IST
युएपीए कायद्याच्या कलम 18, 19, 20 आणि 38, 39 नुसार गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा
ठळक मुद्देएनआयएने देविंदरविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. श्रीनगर विमानतळावर स्ट्रॅटेजिक एंटी हायजॅकिंग टीममध्ये तैनात असलेला अधिकारी देविंदर सिंह याला १२ जानेवारीला अटक करण्यात आली होती.
नवी दिल्ली - दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाअंतर्गत जम्मू काश्मीरचे डीएसपी देविंदर सिंहला अटक केल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या या निलंबित अधिकाऱ्याविरुद्ध आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करणार आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. एनआयएने देविंदरविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच युएपीए कायद्याच्या कलम 18, 19, 20 आणि 38, 39 नुसार गुन्हा नोंदविला आहे.
श्रीनगर विमानतळावर स्ट्रॅटेजिक एंटी हायजॅकिंग टीममध्ये तैनात असलेला अधिकारी देविंदर सिंह याला १२ जानेवारीला अटक करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे हा पोलीस अधिकारी डीएसपी दर्जाचा असून राष्ट्रपतींकडून वीरता पुरस्कारही मिळालेला आहे. या अधिकाऱ्याला दहशतवाद्यांसह त्याच्या कारमध्ये पकडण्यात आले होते. आयबीला मिळालेल्या माहितीनुसार, २००५ साली दिल्ली पोलिसांनी सात दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांकडून AK-47 आणि मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आयबीला एक चिठ्ठीही मिळाली होती. दविंदर यांनी ती चिठ्ठी लिहिली होती. हे सर्व दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधीत असल्याचं म्हटलं जात होतं.या अतिरेक्यांमध्ये हाजी गुलाम मोइनुद्दीन डार उर्फ जाहिद हा एक दहशतवादी होता. त्याच्याकडे देविंदर याचं एक पत्र मिळालं होतं. हे पत्र त्याने त्याच्या लेटहेडवर लिहिलेलं होतं. हाजी गुलाम हा पुलवामा इथला रहिवाश आहे. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि वायरलेस सेट आहे. त्याला कुठल्याही चौकशीशिवाय जावू द्या, थांबवू नका असं त्या पत्रात म्हटलं होतं. हे पत्र त्याने कुठल्या उद्देशाने दिलं होतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हिजबुलच्या दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेल्या पोलिस अधिकारी दविंदर सिंगबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी आणि सिंग यांच्यात १२ लाख रुपयांचे डील झाल्याचे सांगण्यात य़ेत आहे. काश्मीरमधील कुलगाम येथे अटक केल्यानंतर डीएसपी सिंगची चौकशी सुरू आहे. १२ लाख रुपयांच्या बदल्यात दविंदर सिंग दहशतवाद्यांना सुरक्षित चंदीगढला पोहचवणार होता. त्यासाठी त्याने चार दिवसांची सुट्टी घेतली होती.