प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ५ गाड्या जप्त केल्या आहेत. आता वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर हि सहावी गाडी ताब्यात घेतली आहे. कामोठे परिसरातील शीतलधारा सोसायटी आवारात MH ०१, AX २६२७ या क्रमांकाची गाडी जप्त केली आहे.
ही आऊटलँडर कार कामोठे परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती. बरेच दिवस गाडी वापरात नसल्याने स्थानिकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यावरून या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाची व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. NIA ची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत NIA ला वाझे यांच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, १ प्राडो, इनोव्हा,स्फोटक सापडलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर अशा ६ गाड्या सापलेल्या आहेत. एनआयए अजूनही या ६ गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात आहे. जप्त करण्यात आलेली पाचवी मर्सिडीज गाडीचा रजिस्टर नंबर हा नवी मुंबई आरटीओमधला असून पुढील तपास एनआयएकडून केला जात आहे. दरम्यान, सचिन वाझे यांच्याकडून एनआयएच्या पथकाने २ शर्ट जप्त केले. तसेच सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती हा दुसरा कोणी नसून सचिन वाझे असल्याचा दावा करण्यात आला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार जप्त करण्यात आलेल्या पाचव्या मर्सिडीज गाडीद्वारे अंबानी यांच्या इमारतीबाहेरील रोडवरील परिसराची रेकी १५ दिवसांपूर्वी करण्यात आलेली होती.