मोहाली: पंजाबच्या मोहालीमध्ये अजून एक बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 24 तासातील ही दुसरी घटना आहे. न्यूज एजेंसी ANI ने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झाला आहे. विशेष म्हणजे, काल रात्री गुप्तचर विभागाच्या आवारात ग्रेनेड हल्ला झाला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पंजाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याने मोहाली येथील पोलीस इंटेल कार्यालयावर ग्रेनेड हल्ल्याचा सूत्रधार असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, हा हल्ला करणारे दोघे अद्याप फरार आहेत. दोन हल्लेखोरांचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी NIAचे पथक दाखल असून तपास सुरु आहे.
पंजाब पोलिसांच्या संपर्कात असलेली राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) मोहाली हल्ल्याचा तपास सुरू करू शकते. एनआयएच्या दहशतवादी युनिटचे एक पथक पंजाब पोलिसांच्या संपर्कात आहे. एनआयएचा असा दावा आहे की, खलिस्तानी गट पंजाबमध्ये फोफावत आहेत आणि त्यांनी परिसराची गुप्त माहिती घेतल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. मुख्य तपास पथक म्हणून एनआयए आता मोहालीतील हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले आहे. पंजाब पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी टीम सज्ज आहे. पंजाब पोलिसांनी काही लोकांची ओळख पटवली असून त्यांचीही चौकशी केली आहे.
आज(मंगळवार) पंजाबपोलिसांनी मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स विंगच्या मुख्यालयात काल रात्री झालेल्या स्फोटाबाबत पत्रकार परिषद घेतली. पंजाबचे डीजीपी म्हणाले की, आमच्याकडे या प्रकरणाचा सुगावा आहे आणि लवकरच आम्ही हे प्रकरण निकाली लावू. दरम्यान, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये टीएनटी(TNT) असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.