- आशिष सिंहलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या टोळीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया, मनी लॉण्ड्रिंग तसेच अमलीपदार्थांच्या व्यापाराशी संबंधित प्रकरणांची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे (एनआयए) एक पथक शनिवारी पहाटे दुबईला रवाना झाले आहे. या पथकात गुप्तचर विभाग, आर्थिक गुप्तचर तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
गेल्या काही दिवसात दाऊद टोळीविरोधात केलेल्या कारवाईत या टोळीशी संबंधित जागतिक दहशतवादाचे नेटवर्क आणि संघटित गुन्हेगारीच्या कारवायांची महत्त्वपूर्ण माहिती एनआयएच्या हाती आली होती. दुबईत आपला तळ तयार करून दाऊदने भारतात घडवून आणलेल्या दहशतवादी कारवाया, हवाला रॅकेट आणि अमलीपदार्थांच्या व्यापाराचा तपशील त्यात होता. या संदर्भातील पुरावे एनआयएने दुबईतील सुरक्षा यंत्रणांना पुरवले होते. त्यातून झालेल्या माहितीच्या देवाणघेवाणीनंतर एनआयएचे पथक दुबईला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुबईतील सुरक्षा यंत्रणा या पथकाला सहकार्य करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी अटक करण्यात आलेला छोटा शकीलचा मेहुणा सलिम फ्रुट, आसिफ अबुबकर शेख आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांच्याकडून दाऊद टोळीचे दुबईमार्गे होणारे हवालाचे व्यवहार, अमलीपदार्थांचा व्यापार आणि मनी लॉण्ड्रिंगची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यात खंडणीतून मिळालेली रक्कम दाऊद टोळी शब्बीर शेखच्या मांसाची आयात निर्यात करणाऱ्या कंपनीमार्फत आधी दुबईत आणि तेथून कराचीत दाऊदपर्यंत पोहोचविण्याच्या कारवायांचाही तपशील हाती आला होता. अमलीपदार्थांच्या व्यापारातील कमाई हवालामार्फत दुबईला पोहोचविल्याचे पुरावे हाती आले आहेत. या सर्व संशयित व्यवहारांबाबत अधिकाऱ्यांनी दुबई सुरक्षा एजन्सीसोबत चर्चा केली आहे.
नातेवाइकांना भेटण्यासाठी फंडादाऊद इब्राहिमच्या सौदी अरब आणि दुबईतील व्यवसायांचीही माहिती उघडकीस आली आहे. दहशतवादी कारवायांच्या नेटवर्कमधून कमावलेली रक्कम दाऊदने अधिकृत कमाई असल्याचे दाखवून अनेक व्यवसाय उभे केले आहेत. दाऊद टोळी दुबईला आपला तळ तयार करून आश्रयाची व्यवस्था करीत भारतातील आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी तसेच भेटीगाठींसाठी त्याचा वापर करीत असल्याची माहिती एनआयएने दुबईच्या सुरक्षा यंत्रणांना पुरवली आहे.