Uttar Pradesh Crime, Nidhi Sufiyan: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये १७ वर्षीय निधी गुप्ता हिची चौथ्या मजल्यावरून खाली फेकून निर्घृण हत्या केली होती. तिची हत्या करणारा आरोपी सुफियान पोलीस चकमकीत जखमी झाला. आरोपीच्या पायावर गोळी लागली. चकमकीनंतर दुबग्गा पोलिसांनी सुफियानला अटक केली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यूपी पोलिसांनी सुफियानवर २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुफियानला पकडण्यासाठी ५ टीम तयार करण्यात आल्या होत्या. तो राज्याबाहेर पळून जाण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेमुळे आरोपी लखनौमधून पळून जाऊ शकला नाही.
खरं तर, लखनऊच्या दुबग्गा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या सुफियानने निधी या १७ वर्षीय मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले होते. निधीच्या आईचे म्हणणे आहे की, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून मुलीचा छळ करत होता आणि तिचा व्हिडीओ असल्याचे सांगून बळजबरीने धर्म परिवर्तन करण्यासाठी व लग्नासाठी दबाव टाकत होता.
पोलीस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) पीयूष मोरदिया यांनी सांगितले की, निधी गुप्ता आणि आरोपी सुफियान शेजारी राहत होते. सुफियानला निधीसोबत मैत्री करायची होती. दीड वर्षांपासून तो प्रयत्न करत होता. दोन्ही घरच्यांना त्याबद्दल माहिती होती. सुफियानने निधीला एक मोबाईलही भेट दिला. याची माहिती मिळताच निधीचे कुटुंबीय सुफियानच्या घरी गेले. दोन्ही कुटुंबात भांडण पाहून निधी टेरेसवर धावली आणि सुफियान तिच्या मागे टेरेसवर गेला. काही वेळाने निधी खाली पडल्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आला. यानंतर जखमी निधीला रुग्णालयात नेत असताना सुफियानही तिच्यासोबत होता. मात्र, गंभीर जखमी झालेल्या निधीला डॉक्टर वाचवू शकले नाहीत. त्यानंतर सुफियान फरार झाला.
निधीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सुफियानवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू करण्यात आला. या प्रकरणी डीसीपी पश्चिम यांनी आरोपी सुफियानवर २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आज म्हणजेच शुक्रवारी एका चकमकीत त्याला अटक करण्यात आली. त्याला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला KJNMUमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस आता निधीच्या कुटुंबीयांच्या प्रत्येक आरोपाची चौकशी करणार असल्याची चर्चा आहे.