नालासोपारा - विरार नालासोपारा या परिसरात विनापरवाना राहणाऱ्या नायजेरियन लोकांवर कारवाई करण्याची पोलिसांनी तयारी सुरू केली असून बनावट व्हिसा तयार करून भारतात राहणाऱ्या एका नायजेरियनला एलसीबीच्या वसई युनिटने मंगळवारी पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या दोन्ही शहरात नायजेरियन लोकांची वस्ती वाढत चाललेली असून त्यांच्याकडे पुरावा आहे की नाही याची चौकशी करणे गरजेचे असून अमली पदार्थांची तस्करी करताना या परिसरातील अनेक नायजेरियनला पोलिसांनी पकडले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार एलसीबी वसई युनिटची टीम मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास विरार पूर्वेकडील परिसरात पेट्रोलिंग करत असताना मनवेल पाडा परिसरातील आश्रया बार अँड रेस्टॉरेंटच्या समोरून आरोपी ओनूओहा नेरुस ची (34) हा रस्त्यावरून पायी जात असताना त्याला पासपोर्ट आणि व्हिजा आहे का याची विचारपूस केली परंतु त्याने दिलेला व्हीजा हा बनावट असल्याचे उघड झाले आणि तो खरा असल्याचे भासवून शासनाची फसवणूक करून भारतात विनापरवाना वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.