लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बंद असलेल्या घरांची रेकी करून रात्री घरफोडी करणाºया एका टोळीच्या मुसक्या आवळ्यात शहर पोलिसांना शुक्रवारी उशीरा रात्री यश आले. टोळीतील पाच अट्टल चोरट्यांना जेरबंद करून शहर पोलिसांनी ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शहर आणि परिसरात गत काही दिवसांत चोरीच्या घटना घडल्या. कोरोना लॉकडाऊन कालावधीत घडलेल्या घटनांचा शोध घेताना शहर पोलिसांनी डी.बी.पथक सक्रीय केले. दरम्यान, खामगाव येथील संदीप महादेव पांड यांनी २ आॅक्टोबर रोजी त्यांचे भाचे दर्शन अशोक वाठ यांच्या बंद घरात ५० हजाराची चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर डी.बी. पथकाचे पीएसआय गौरव सराग आणि त्यांच्या पथकाने वाठ यांच्याकडे घडलेल्या घटनेसह शहरातील आणखी काही चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला. त्यावेळी शहरातील डीपी रोडवरील एका बंद घराच्या बाजूने चौघे जण संशयास्पद स्थितीत बसलेले आढळून आले. त्यामुळे डी.बी. पथकाने चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता डॉ. गायकवाड यांच्या हॉस्पीटल मागील घरी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील मुद्देमाल त्यांचा साथीदार चेतन राजेश डाकुर(१९) रा. रावणकडे असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चेतन डाकुर याला अटक केली त्याच्याकडून सोने चांदी दागिणे असा ५१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया , अपर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुनील अंबुलकर, उपनिरिक्षक गौरव सराग, पोहकॉ गजानन बोरसे, पो.ना. राजेंद्र टेकाळे, संदीप टाकसाळ, सुरज राठोड, नवाज शेख, दीपक राठोड, प्रफुल टेकाडे, अरविंद बडगे, संतोष वाघ, गौरव निर्मळ यांनी ही केली.
दिवसा रेकी आणि रात्री चोरी!- शहराच्या विविध भागात दिवसा फिरून बंद असलेल्या घरांची रेकी करायची. हे घर रात्रीच्या वेळी नियोजनबध्द पध्दतीने फोडून चोरीचे उद्दीष्ट गाठायची पध्दत या टोळीतील अट्टल चोरट्यांची आहे.
गत काही दिवसांमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डी.बी. पथकाला सक्रीय करण्यात आले. दरम्यान, दिवसा बंद असलेली घरे हेरून रात्री चोरी करणाºया एका टोळीला अटक करण्यात आली. या अट्टल चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.- सुनिल अंबुलकरशहर पोलिस निरिक्षक, खामगाव.