फरिदाबाद - लग्नास नकार दिल्याने एका तरुणीची तिच्या मैत्रिणीसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना गतवर्षी घडली होती. या घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. तसेच काही जणांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आता या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला असून, निकिता तोमर या तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपी तौसिफ आणि रेहान यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. दोषी आरोपींना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
निकिता तोमर हत्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये एकूणन ५७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना आरोपी तौसिफ आणि रेहान यांना दोषी ठरवले. तर आरोपींना हत्यार पुरवणारा तिसरा आरोपी अझरुद्दीन याला दोषमुक्त केले.
उत्तर प्रदेशमधील हापूड येथील रहिवासी असलेली निकिता तोमर ही तरुणी अग्रवाल कॉलेजमध्ये बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी होती. २६ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी पावणेचारच्या सुमारास ती परीक्षा देऊन कॉलेजमधून बाहेर पडली तेव्हा सोहना येथील रहिवासी तौसिफ याने आपला मित्र रेहान याच्यासोबत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी झालेल्या झटापटीत तौसिफने केलेल्या गोळीबारात निकिताचा मृत्यू झाला होता.
तौसिफ हा निकितावर विवाहासाठी दबाव आणत होता, असे निकिताच्या कुटुंबीयांनी सांगितले. निकिताने त्याच्यासोबतच्या मैत्रीस आणि विवाहास नकार दिल्याने तौसिफने तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान निकिताचा मृत्यू झाला होता. ही घटना सीसीटीव्हमध्ये कैद झाली होती. त्याच्या आधारावर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, आरोपींनी २०१८ मध्येही आरोपीने निकिताच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर निकिताच्या कुटुंबीयांनी तौसिफला अटक केली होती. मात्र तौसिफच्या कुटुंबीयांनी विनवण्या केल्यानंतर निकिताच्या कुटुंबीयांनी खटला मागे घेतला होता. मात्र तौसिफने निकिताला त्रास देणे सुरूच ठेवले होते.