लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा मेहुणा मयांक मेहता याने केलेल्या प्रवासाबाबत ईडी व सीबीआय या दोन तपासयंत्रणांमध्ये मतभिन्नता असल्याचे निष्पन्न झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शनिवारी मांडले.
मयांकला हाँगकाँग येथे परतण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली. त्यास सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे होती. मेहता आधी आरोपी होता. मात्र, नंतर त्याला माफी देण्यात आली. नीरवची बहीण पूर्वी व मयांक यांनी नीरवच्या घोटाळ्यांबाबत त्यांच्याकडील माहिती न्यायालय व तपासयंत्रणांना देण्याची तयारी दर्शवली. त्या मोबदल्यात त्यांच्या प्रवासावरील प्रतिबंध हटविण्याची विनंती तपासयंत्रणेला केली. त्यानंतर ईडीने मेहताला साक्षीदार केले. मेहताला प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर सीबीआयने तो एका प्रकरणात आरोपी असल्याने प्रवास करू शकत नाही, असे म्हटले. या निर्णयाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले. मेहता सीबीआयच्या केसमध्येही आरोपी आहे की नाही, अशी विचारणा विशेष न्यायालयाने केली होती. त्यावेळी त्यांनी नकारार्थी उत्तर दिले होते.