नरेश डोंगरे
नागपूर - निर्भयाच्या थरारकांडातील क्रूरकर्म्यांना शुक्रवारी देण्यात आलेली भारतातील या दशकातील ही चौथी फाशीची शिक्षा आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळातील ती पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे. यापूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात पाच वर्षांत तीन दहशतवाद्यांना फासावर टांगण्यात आले होते.
१६ डिसेंबर १९१२ ला दिल्लीत धावत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आला होता. मुकेश सिंग (वय ३२), पवन गुप्ता (वय २५), विनय शर्मा (वय २६) आणि अक्षयकुमार सिंग (वय ३१) हे नराधम हिंस्र श्वापदांसारखे तिच्यावर तुटून पडले होते. या नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेने १५ दिवसानंतर सिंगापूरच्या इस्पितळात शेवटचा श्वास घेतला होता. संपूर्ण देशात रोष निर्माण करणाऱ्या या घटनेतील पीडितेला निर्भया असे नाव देण्यात आले होते. निर्भया प्रकरणाने भारतात महिला अत्याचारविरोधक कायदे अधिक कडक करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी तेव्हापासून रेटून धरण्यात आली होती. दुसरीकडे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंगने कायद्यातील पळवाटा शोधून तब्बल तीनवेळा मृत्युदंडाचा आदेश (डेथ वॉरन्ट) रद्द करवून घेतला होता. दोन आठवड्यांपूर्वी चौथ्यांदा त्यांचा डेथ वॉरन्ट काढण्यात आला आणि २० मार्चला त्यांना तिहार कारागृहात फाशी देण्याचे आदेश कोर्टाने जारी केले. राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी ठरली आहे. कारण यापूर्वी २६/११ च्या आरोपी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात २१ नोव्हेंबर २०१२ ला फासावर टांगण्यात आले. २००१ साली झालेल्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरू याला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. त्यानंतर ३० जुलै २०१५ ला याकूब मेमन या दहशतवाद्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. त्यावेळी देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते. त्यांच्याकडून तीनही दहशतवाद्यांच्या दयेचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. यापूर्वी राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळात कोणत्याही आरोपीला फाशी देण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली आहे.
Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय
नारी शक्ती! सात वर्षे एक पैसाही न घेता लढली; कोण आहेत या वकील सीमा कुशवाहा नवीन तरतुदीनुसार तिहारमध्ये ट्रायलनिर्भया प्रकरणानंतर महिला अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांच्या शिक्षेचे स्वरूप बदलले. अनेक नवीन तरतुदी झाल्या. तर, अफजल गुरूच्या फाशीनंतर निर्माण झालेली ओरड लक्षात घेता, फाशीच्या शिक्षेच्या संबंधाने नवीन कायदे बनविले. नियमावली तयार झाली. त्या नवीन तरतुदीनुसार फाशीच्या शिक्षेची पहिली अंमलबजावणी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ ला झाली. येथे याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यावेळी काय काय दक्षता घेण्यात आली, कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली. त्याची संपूर्ण माहिती तत्कालीन कारागृह अधिकाऱ्यांकडून तिहार प्रशासनाने घेतली होती. त्यानुसारच तिहारमध्ये या चौघांच्या फाशीच्या शिक्षेची स्क्रीप्ट तयार करण्यात आली असून, त्याची ट्रायल घेतली गेली होती.