निर्भयाच्या दोषींना मोठ्या न्यायालयीन प्रक्रियनेनंतर आज फासावर चढविण्यात आले. एका आरोपीने काही वर्षांपूर्वीच आत्महत्या केली होती. आज निर्भयाच्या आत्म्याला शांती लाभली अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली. पण फाशी देण्याची रात्र दोषींसाठी काळरात्र ठरली होती. निर्भयावर अत्याचार करताना जी त्यांनी क्रूरता दाखविली होती, त्याच्या पेक्षा नाही पण इथेच करायचे, इथेच भोगायचे, या उक्तीप्रमाणे तडफडत शेवटची रात्र घालवली.
निर्भयावर सहा जणांनी धावत्या बसमध्ये अत्याचार केला होता. त्यापैकी आणखी एक अल्पवयीन तीन वर्षांची शिक्षा भोगून सध्या बाहेर आहे. तर अन्य चार जणांनी याचिकावर याचिका करत फाशी लांबवली होती. आज पहाटे फाशी देण्यापूर्वी या चौघांना मरणयातनाच भोगाव्या लागल्या.
फाशी देण्यासाठी त्यांना पहाटे साडेतीन वाजता उठविण्यात आले. या दोषींना अंघोळ घातली गेली. यानंतर त्यांना स्वच्छ नवीन कपडे देण्यात आले. यानंतर त्यांना चहा, नाश्ता देण्यात आला. फाशीच्या एक तास आधी त्यांना जेल सुपरिटेंडंट, जिल्हा दंडाधिकारी आणि मेडिकल ऑफिसर येऊन भेटले आणि त्यांची शेवटची इच्छा विचारली.
जेलरने चारही दोषींना जेल नंबर ३ मध्ये आणले. यानंतर त्यांना हिंदीमध्ये त्यांचा डेथ वॉरंट वाचून दाखविण्यात आला. यानंतर पवन जल्लादचे काम सुरू झाले. जल्ल्दाने दोषींचे पाय करकचून बांधले. त्यांच्या तोंडावर कापडी पिशवी टाकली आणि गळ्यास फासाचे दोर टाकले. यानंतर सुपरिटेंडंटनी घडाळ्यामध्ये वेळ पाहत जल्लाद पवनला फास ओढण्याचा इशारा केला. याचबरोबर क्षणाचाही विलंब न लावता. जल्लादाने लिव्हर ओढला, धाड असा आवाज होत दोषींच्या पायाखालील दरवाजा उघडला आणि या नराधमांना अखेर लटकविण्यात आले.
हे सारे होण्याआधीची ३० मिनिटे खूप भयावह गेली. दोषींना फासावर नेण्याचे जेव्हा सांगण्यात आले तेव्हा ते रडले, जमिनीवर गडागडा लोळले. हात पाय बांधण्यासही त्यांनी नकार दिला. एका दोषीने तर फरशीवर लोळण घेत पुढे जाण्यास विरोध केला. अखेर त्याला ओढत ओढत फाशीगृहामध्ये नेण्यात आले.