नवी दिल्ली - हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे आज हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केला आणि संपूर्ण देशात हैदराबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया हत्याकांडातील एका आरोपीने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दयेची याचिका दाखल केली आहे. गृह मंत्रालयाने २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी विनय शर्मा यांच्या दया याचिकेची फाईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली असून दया याचिका फेटाळून लावावी अशी गृह मंत्रालयाने शिफारस केली. यापूर्वी दिल्ली सरकारने दयेची याचिका रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे राष्ट्रपती या दया याचिकेवर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.निर्भयाकांडातील आरोपी विनय शर्मा याने दयेची याचिका केली आहे. त्याची दयेची याचिका रद्द करण्यात यावी, अशी शिफारस दिल्ली सरकारने केली होती. दिल्ली सरकारचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शिफारशीची फाइल नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पाठवली होती. दया याचिका करणाऱ्या आरोपींने अत्यंत घृणास्पद गुन्हा केलेला आहे. अशा प्रकारचे अत्याचार रोखणं गरजेचं आहे. त्यामुळे हे गुन्हे रोखण्यासाठी पुन्हा कोणी अशाप्रकारचा गुन्हा करण्यास धजावणार नाही, अशी शिक्षा या आरोपीला केली पाहिजे. दया याचिका निराधार आहे, ही याचिका रद्द करण्यात यावी, असं दिल्ली सरकारने केलेल्या शिफारशीत म्हटलं आहे. ४ नोव्हेंबर रोजी आरोपी शर्माने ही दयेची याचिका केली आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपी असून कोर्टाने या चारही जणांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे.
Nirbhaya Gang Rape : आरोपीची दया याचिका फेटाळा, राष्ट्रपतींकडे गृह मंत्रालयाची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 2:58 PM
Nirbhaya Case : राष्ट्रपती या दया याचिकेवर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठळक मुद्देगृह मंत्रालयाने २०१२ मध्ये दिल्लीत निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी विनय शर्मा यांच्या दया याचिकेची फाईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली आली दया याचिका फेटाळून लावावी अशी गृह मंत्रालयाने शिफारस केली.