महिला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. महिलांविषयी आदरयुक्त भावना निर्माण करणे, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भिती निर्माण करत अशा सर्व गुह्यांचे समूळ उच्चाटन होण्यास महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी घोषणा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज केली. मुंबईसाठीच्या निर्भया पथकाचे आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पथकाची कामगिरी प्रभावी होण्यासाठी कॅमेरे, मोबाईल फोन पुरवण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी 103 क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. महिला सुरक्षेसाठी निर्भया पथक मुंबईच्या कोनाकापऱ्यात पोहचत आहे. कॉर्नर मिटिंग, कार्यशाळेदरम्यान स्त्रियांना स्वसंरक्षणाची माहिती देण्यात येत आहे. निर्भया पथकाचे फेसबुक, इन्स्टाग्राम पेज सुरु करण्यात आले आहेत. निर्भया पुस्तकाच्या स्वरूपात सर्व महिलांपर्यंत पोहचवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
महिला पोलिसांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. पीडित व्यक्तीसाठी सक्षम उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून मानसिक सक्षमिकरणासाठी प्रयत्न होत आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 5 निर्भया सक्षम केंद्राचे उदघाटन करण्यात आले. तसेच निर्भया पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी मुंबई पोलिसांच्या उपक्रमाबाबत अभिमान व्यक्त केला, तसेच आभासी पद्धतीने उपस्थिती असली तरी पाठींबा आभासी नाही, असे म्हणत त्यांनी गेल्या दोन वर्षांत मुंबई पोलिसांवर करण्यात आलेल्या आरोपांवर मुंबई पोलिसांच्या पाठीशी होतो, याचे संकेत दिले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होणे ही, चिंताजनक बाब असल्याचे म्हटले आहे. महिलांशी संबंधीत कुठल्याही घटनेकडे दुर्लक्ष करू नका, प्रत्येक छोट्या घटनेकडे गांभीर्याने पहावे, म्हणजे पुढील अनुचित घटना टळतील, असे आवाहन पोलिसांना केले. यावेळी निर्भया पथकासाठी वाहनांचे उद्घाटन करण्यात आले.