शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाला. मंगळवारी सहा तास आणि बुधवारी चार तास दोन्ही बाजुंकडून युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणावर न्यायालयाने उद्यासाठी निकाल राखून ठेवला आहे.
नितेश राणेंच्या पीएने आरोपी सचिन सातपुते अनेकदा फोन केले होते, हे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. आरोपींचा नितेश राणेंशी संबंध असल्याचे तांत्रिक पुरावे आहेत. पीएने सातपुतेला ३३ वेळा फोन केला होता, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला आहे. याला प्रत्युत्तर देण्यास उभे राहिलेले नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी युक्तीवादावेळी आरोपी आणि फिर्यादीच बदलून टाकले.
नितेश राणे आणि मारहाण करणारे आरोपी यांना संग्राम देसाई यांचा फिर्यादी असा उल्लेख केला, तसेच ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, त्या संतोष परब यांचा उल्लेख आरोपी म्हणून केला. काही वेळ असाच उल्लेख केल्याने गोंधळ उडाला. शेवटी राणेंसाठी युक्तीवाद करणारे प्रदीप घरत या दुसऱ्या वकिलांनी संग्राम देसाई यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली. बाहेर पत्रकारांना या दुसऱ्या वकिलांनी हा किस्सा सांगितला.
यावेळी ते म्हणाले, तणावाचे वातावरण निवळले, कदाचित देसाई यांच्या मनातील बाहेर आले, असे हसत हसत सांगितले. त्यांना तुम्ही युक्तीवाद करताय ते आरोपीच्या वतीने करताय, फिर्यादीच्या वतीने नाही, याची मी त्यांना जाणीव करून दिल्याचे ते म्हणाले. सरकारी वकील या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.