लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी भाजपचे आमदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा नीतेश राणे यांना शुक्रवारपर्यंत अटक करणार नाही, असे आश्वासन कणकवली पोलिसांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिले. याप्रकरणी नीतेश राणे हे ‘’मास्टरमाईंड’’ होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी न्या. सी. व्ही. भडंग यांना दिली.
सकृतदर्शनी नीतेश राणे यांच्याविरोधात पुरावे आहेत. राणे साक्षीदारांवर दबाव टाकत आहेत. कोणीही साक्षीदार जबाब नोंदवण्यासाठी पुढे येत नसल्याची माहिती पासबोला यांनी न्यायालयाला दिली.राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी हे सर्व आरोप फेटाळले. नीतेश राणे पोलीस तपासास सहकार्य करण्यास तयार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने राणे यांनी केलेल्या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कणकवली पोलिसांना दिले. सरकारी वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागताच प्रधान यांनी राणे यांना तोपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती न्यायालयाला केली.
त्यावर कणकवली पोलिसांनी पुढील सुनावणीपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, असे आश्वासन न्यायालयाला दिले. न्यायालयाने ते मान्य करत राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी ठेवली.कणकवली पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यावर राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. परंतु, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने राणे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.
कणकवली पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार संतोष परब यांच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले. त्यांच्यावर वार करणाऱ्या हल्लेखोराने ही माहिती गोट्या सावंत व नीतेश राणे यांना द्यायला पाहिजे, असे कारमध्ये बसत फोनवर कोणाला तरी सांगितले.