Nitin Gadkari: हायवेवर खड्ड्यांमुळे अपघात, कार मालकाची थेट नितीन गडकरींकडे तक्रार; २ तासांत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:39 PM2021-10-13T21:39:25+5:302021-10-13T21:40:57+5:30
Nitin Gadkari in Action: खरेतर टोल आकारत असलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे असतात. तेथून वाहन चालकांना कसरत करत पुढे जावे लागते आणि त्या रस्त्याच्या देखभाल आणि निर्मितीसाठी तसेच सेवांसाठी टोल भरावा लागतो. मध्य प्रदेशमध्ये हा अपघात झाला होता.
गावागावातील रस्तेच नाहीत तर मुंबई, पुण्यासारखी मेट्रो शहरे आणि राष्ट्रीय महामार्गांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होतात. काहींचा जीव जातो तर काहींना गंभीर दुखापती होतात. तरीही निर्ढावलेल्या यंत्रणा खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करतात. रस्ते तयार करतानाही करोडोंचा भ्रष्टाचार होतो, ते वेगळच. मध्य प्रदेशमध्ये एका राष्ट्रीय महामार्गावर खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात (Road Accident) झाला, त्या कार मालकाने थेट नितीन गडकरींकडे (Nitin Gadkari) तक्रार केली. यानंतर दोन तासांत तो खड्डा बुजविण्यात आला आणि कंपनीवर कारवाई देखील झाली.
खरेतर टोल आकारत असलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे असतात. तेथून वाहन चालकांना कसरत करत पुढे जावे लागते आणि त्या रस्त्याच्या देखभाल आणि निर्मितीसाठी तसेच सेवांसाठी टोल भरावा लागतो. मध्य प्रदेशच्या एनएच-47 वर एका वकिलाच्या कारला अपघात झाला. त्याने गडकरींकडे याची तक्रार केली. गडकरींच्या आदेशावरून NHAI ने ओरिएंटल स्ट्रक्टर इंजिनिअरिंग कंपनीवर गुन्हा दाखल केला असून तेथील खड्डे दोन तासांत बुझविण्यात आले आहेत.
बैतूलच्या आमलामध्ये राहणारे वकील राजेन्द्र उपाध्याय हे त्यांच्या आईवर उपचार करण्यासाठी नागपूरहून घरी परतत होते. तेव्हा हिवरा गावाच्या जवळ रस्ता खराब असल्याने त्यांची कार उलटली. यामध्ये ते आणि त्यांची आई दोघेही जखमी झाली. उपाध्याय यांनी याची तक्रार चिचौली पोलिस ठाण्यात केली होती. एनएच-47 च्या देखरेखीचे काम ओरिएंटल कंपनी करत आहे. या कंपनीने रस्त्यावर खड्डे खोदले होते. परंतू वाहन चालकांना सावध करण्यासाठी कोणताही बोर्ड किंवा सूचना लावली नव्हती. यामुळे त्याच दिवशी आणखी दोन कारचा तिथे अपघात झाला होता. यामुळे एनएएचएआयने कंपनीला आरोपी बनवत गुन्हा दाखल केला आहे.