निटूर (जि़ लातूर) - निलंगा तालुक्यातील निटूर येथील दोन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजारांचा ऐवज पळविल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली़.पोलिसांनी सांगितले की, निटूर येथील अकबर अहमदसाब शेख यांनी मंगळवारी सोयाबीन पट्टीचे २५ हजार रुपये आणून घरी ठेवले होते़ रात्री ते कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने घराबाहेर होते़ दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करुन कपाटातील रोख २५ हजार रुपये व दागिणे असा एकूण ५३ हजार रुपयांचा ऐवज पळविला़.शेख यांच्या घराशेजारीच रूक्मिणबाई साहेबराव सोमवंशी (पाटील) यांचे घर आहे़ चोरट्यांनी त्यांच्याही घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख २० हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज पळविला़. याप्रकरणी अकबर शेख यांच्या फिर्यादीवरुन शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तज्ज्ञांनी घेतले ठसे
घटनास्थळास शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक डी़पी़ पाटील, पोउपनि़ अमोल पन्हाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली़ तसेच ठसे तज्ज्ञास व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते़ श्वानपथक घरापासून काही अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत जाऊन घुटमळले अधिक तपास पोलीस जमादार रमेश इंगळे करीत आहेत.