भोपाळ – लग्न जमवताना अनेकदा दोन्ही मंडळींमध्ये वाद-विवाद झालेला आपण पाहिला असेल. परंतु भोपाळमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी मध्यस्थीने २ लाख रूपये घेऊनही लग्न न जमवल्याने संतापलेल्या नवऱ्याने मध्यस्थीला चालत्या कारमधून बाहेर फेकून दिले. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हे प्रकरण मध्यप्रदेशातील आहे. याठिकाणी नवरदेव लग्नासाठी वऱ्हाड घेऊन पोहचला पण नवरी आणि तिचं कुटुंबीय आलंच नाही. या प्रकारावरून संतापलेल्या वऱ्हाडी मंडळींनी ही क्रूर घटना केली. यात मध्यस्थी आणि त्याच्या सहकाऱ्याला वऱ्हाडातील मंडळींनी चालत्या कारमधून फेकून दिले. यात मध्यस्थीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना एक महिना जुनी आहे.
मध्यस्थीने २ लाख रुपये नवऱ्या मुलाच्या कुटुंबीयांकडून घेतले होते. ६ एप्रिल रोजी मुलाचं लग्न ठरवण्यात आलं होतं. त्यासाठी वऱ्हाड घेऊन नवरदेव सागर मंडपात पोहचला पण तिथे नवरी अन् तिचं कुटुंबीय आलंच नव्हतं. या प्रकारावर नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय संतापले. ७ एप्रिल रोजी पुन्हा परतत असताना नवरदेव आणि त्याच्या ३ सहकाऱ्यांनी हसनाबाद ते सरकंडी गावाच्या मध्ये कारमधून मध्यस्थी जगदीश मेहर आणि त्याचा सहकारी हेमराज या दोघांना चालत्या गाडीमधून फेकून दिले.
या घटनेत जगदीश मेहरचा जागीच मृत्यू झाला आणि हेमराज मेहर गंभीररित्या जखमी झाला. जखमी हेमराजवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर जेव्हा तो बरा झाला तेव्हा ९ मे रोजी त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ या घटनेतील ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
२ आरोपी अटकेत तर इतर दोघे फरार
बैरसिया ठाणे पोलिसांनी जखमी हेमराज मेहर यांच्या तक्रारीवरून आरोपी नवरदेव आणि त्याच्या ३ सहकारी मंगीलाल मेहर, चिरोंजीलाल आणि रामप्रसाद मेहर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल आहे. पोलिसांनी या सगळ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात २ आरोपींना अटक केली तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.